मुंबई : माझ्यासमोर धर्मसंकट असलं तरी मी राजधर्म पाळणार, मुलगा अमोल किर्तीकर (Amol Kiritikar) निवडणुकीच्या रिंगणात असला तरी मी माझ्या पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांचाच प्रचार करणार, असं शिवसेनेचे (Shiv Sena) उत्तर पश्चिम मतदारसंघाचे (Mumbai North West Lok Sabha constituency) विद्यमान खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) म्हणाले.  महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकर यांच्या लोकसभा निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी गजानन किर्तीकरही उपस्थित होते. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात किर्तीकर यांचे सुपुत्र आणि ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याविरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमदेवार रवींद्र वायकर यांच्यात लढत होणार आहे.


 यावेळी गजानन किर्तीकर यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. "रवींद्र वायकर माझ्या पक्षाचे उमेदवार आहेत.  मी सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. माझ्या पक्षाच्या उमेदवाराला समर्थन देणं हे माझं काम आहे. मी एकनाथ शिंदेंना सांगितलं, माझ्यावर जरुर धर्मसंकट आहे. पण मी राजधर्म पाळणार आहे. या लोकसभा क्षेत्रात आम्ही आमच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करु. सर्व कार्यकर्ते आणि आम्ही एकजुटीने काम करु. आमचं एकच लक्ष आहे, नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे. मोदींनी 370 कलम हटवलं, अर्थव्यवस्था बळकट केली, आणि राम मंदिर पूर्ण करुन हिंदुत्व दाखवून दिलं. त्यामुळे येत्या 10-15 वर्षे मोदीच पंतप्रधान हवेत ही केवळ भाजपची नव्हे तर आमचीही जबाबदारी आहे", असं गजानन किर्तीकर म्हणाले.


अमोल उबाठामध्ये, मी शिंदेंच्या शिवसेनेत


 "अमोल सध्या उबाठा गटात आहे. मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहे. मी दहा वर्ष खासदार आहे, तीन वेळा युतीमध्ये लढलेलो आहे. युतीचा धर्म पाळणार. अमोल समोर उभा असला तरी मी निवडणूक लढणार नाही.  मी दीड महिन्यापूर्वी सांगितलं मी निवडणूक लढणार नाही उमदेवार फायनल करा. उमेदवार कोण असेल हे ठरवण्याचा हा नैतिक अधिकार मला नाही", असं गजानन किर्तीकरांनी सांगितलं.  


रवींद्र वायकर यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन


लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून अखेरच्या क्षणी मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी रवींद्र वायकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. कालच रवींद्र वायकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत वायकर यांच्या लोकसभा निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.


जोगेश्वरी पूर्वेकडील मजास डेपोसमोरील रस्त्यावर हे निवडणूक कार्यालय उघडण्यात आले. यावेळी खासदार गजानन किर्तीकर,आमदार आशिष शेलार ,आमदार अमित साटम, आमदार विद्या ठाकूर, आमदार भारती लव्हेकर तसेच महायुतीचे अनेक माजी नगरसेवक तसेच शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.  


Gajanan Kirtikar Video : गजानन किर्तीकर नेमकं काय म्हणाले?



 


संबंधित बातम्या  


वडील बिडील असली फिलिंग नाही, मी प्रचारावेळी राजधर्मच पाळणार, गजाभाऊंनी बापलेकांचं नातं बाजूला ठेवलं   


एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या खास मोहऱ्यालाच रिंगणात उतरवलं, उत्तर-पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना उमेदवारी