मुंबई: वायव्य मुंबई मतदारसंघाचे मावळते खासदार आणि शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांच्या वक्तव्यावरुन महायुतीत सध्या चांगलाच वाद पेटला आहे. शिंदे गटात गेल्यामुळे मी कुटुंबात एकटा पडलो, असे गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी म्हटले होते. यानंतर शिशिर शिंदे यांनी कीर्तिकरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही गजानन कीर्तिकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गजानन कीर्तिकर यांनी त्यांचा मुलगा अमोलला (Amol Kirtikar) बिनविरोध निवडून आणण्यासाठी कट रचला, असे दरेकर यांनी म्हटले. त्यानंतर गजाभाऊंनीही प्रवीण दरेकरांच्या या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिले. कटकारस्थान करणे मला जमत नाही, ती सवय भाजपची आहे, असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले.


भाजपचे नेतेच कटकारस्थानी असून दुसऱ्यावर आरोप करतात. त्यामुळे त्यांची डोकी तशीच चालतात. कट करणे हे माझ्या रक्तात नाही. अमोलने निवडणूक लढविणार असल्याचे आधीच जाहीर केले होते व तो शिंदे गटाकडून लढण्यास तयार नव्हता. माझे निवृत्तीचे वय झाल्याने व मुलाविरोधात लढणे उचित नसल्याने मीही लढणार नसल्याचे आधीच जाहीर केले होते, असे कीर्तिकर यांनी दैनिक 'लोकसत्ता'शी बोलताना सांगितले. कीर्तिकरांच्या या वक्तव्यामुळे आता भाजपचे इतरही नेते आक्रमक होऊन महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले?


अमोल कीर्तिकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट होता, हा माझा जाहीर आरोप आहे. एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी मिळवायची. अमोल कीर्तिकरांसमोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील आणि दुसरा कोणीही उमेदवार नसेल आणि नंतर गजानन कीर्तिकर उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि आपल्या मुलाला बिनविरोध खासदार म्हणून निवडून आणायचे, हा गजानन कीर्तिकरांचा पूर्वनियोजित कट होता, असा माझा आरोप आहे. 


शिंदे गटाच्या दीपक केसरकरांचा कीर्तिकरांना सल्ला


असा प्रसंग महाभारतामध्येही आला होता. अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य खाली ठेवले होते. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनला समजावून सांगितले की,युद्धात समोर आपला नातेवाईक असेल तरी त्याच्याशी शत्रू म्हणून लढायचं असते. कीर्तिकर यांनाही असा सांगणारा कोणी भेटला असता तर त्यांनीही युद्ध केले असते. शेवटी हा घरगुती प्रश्न आहे.  गजानन कीर्तिकर यांनी उघडपणे प्रचार केला नाही पण ते शांत बसले होते. पण हे वाद जे होत आहे त्यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री आणि गजानन कीर्तीकर यांनी एकत्र बसून हा वाद मिटवावा, असा सल्ला राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.


आणखी वाचा


अमोल जिंकला तर वडील म्हणून आनंद; वायकर जिंकला काय अन् हरला काय, माझा काय दोष: गजानन कीर्तिकर