नवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे देशात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार असून भाजपला गेल्या वेळीप्रमाणे 303 च्या जवळपास जागा मिळतील असा दावा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी केला. एनडीटीव्हीला दिलेल्या मुराखतीमध्ये प्रशांत किशोर यांनी हा दावा केला आहे. भाजपच्या 400 पारच्या चर्चेमुळे निवडणुकीची दिशा बदलली असून त्यामुळे नरेंद्र मोदी हरतील अशी चर्चा न होता भाजप किती जास्त जागा मिळणार ही चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. 


निकालाचा परिणाम शेअर बाजारावर होणार


भाजप म्हणतंय त्याप्रमाणे जर त्यांनी 370 जागा जिंकल्या नाहीत तर त्याचा परिणाम शेअर बाजारावर होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. प्रशांत किशोर म्हणाले की, "जेव्हा एखाद्या नेत्याकडून अपेक्षा खूप जास्त असतात आणि चांगली कामगिरी करूनही ती पूर्ण होत नाही, तेव्हा त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येतो. त्याचप्रमाणे जर भाजपला 370 पेक्षा कमी जागा मिळाल्या, तर तो विषय होऊ शकतो. त्यावर चर्चा होऊ शकते आणि त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येतो.


निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी असा दावा केला की केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात नागरिकांमध्ये कोणताहीअसंतोष नाही किंवा त्यांना मजबूत राजकीय पर्याय नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. यावेळी भाजप 2019 च्या 303 जागांपेक्षा जवळपास किंवा जास्त जागा जिंकू शकतो.


मोदी पुन्हा सत्तेत येणार


प्रशांत किशोर म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप पुन्हा सत्तेत येत आहे. त्यांना मागील वेळेपेक्षा समान किंवा किंचित जास्त जागा मिळू शकतात. जर भाजपने 275 जागा जिंकल्या तर त्यांचे नेते सरकार स्थापन करणार नाही असे म्हणणार नाहीत. कारण त्यांनी 370 जागा जिंकण्याचा फक्त दावा केला आहे. भाजप बहुमताचा आकडा पार करतो की नाही हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. पण भाजपसा सत्ता परत मिळवण्यात काही धोका आहे असं मला वाटत नाही.


प्रशांत किशोर म्हणाले की, "गेल्या तीन ते चार महिन्यापासून भाजपची 370 आणि 400 च्या पुढे चर्चा सुरू आहे. ही भाजपची रणनीती किंवा विरोधकांचा कमकुवतपणा समजा, पण भाजपने आपले लक्ष्य 272 वरून 370 पर्यंत वाढवले आहे. याचा फायदा भाजपला झाला. त्यामुळे नरेंद्र मोदी या निवडणुकीत हरतील ही चर्चाच झाली नाही. फक्त भाजप 370 जागा मिळवणार की त्यापेक्षा कमी-जास्त मिळवणार याचीच चर्चा झाल्याचं दिसतंय."


ही बातमी वाचा: