Shirdi News : साई संस्थानचे (Sai Sansthan) सभासद करून देण्याचं आमिष दाखवत एका भुरट्याने थेट उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) माजी आमदारालाच गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमोल गुजराथी असे संशयिताचे नाव असून त्याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Continues below advertisement


याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील माजी आमदार जोगिंदर सिंह गिरवर सिंह अवाना यांची शिर्डीत अमोल गुजराथी नावाच्या व्यक्तीने फसवणूक केली आहे. अवाना हे साईबाबांचे निःस्सीम भक्त असून दरवर्षी ते दर्शनासाठी शिर्डीत येतात. त्यांना राजस्थानच्या एका संघटनेचे प्रतिनिधी म्हणून काही काळ कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा होता. 


व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करून सभासद होण्याचा प्रस्ताव


अमोल गुजराथी या व्यक्तीने त्यांना साईबाबा संस्थानचे सभासद होण्याचे आमिष दाखवले आणि त्यासाठी 6000 रुपये घेतले. काही दिवसांपूर्वी त्यांची नवनाथ घुले यांच्यामार्फत अमोल गुजराथी याच्याबरोबर ओळख झाली होती. गुजराथीने अवाना यांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करून साईबाबा संस्थानचे सभासद होण्याचा प्रस्ताव दिला. यामुळे व्हीआयपी दर्शनाची सुविधा व दर्शनासाठी प्रोटोकॉल मिळेल, प्रत्येक राज्यातून एका सदस्याची निवड होणार असल्याचे त्याने सांगितले. 


पैसे उकळल्यानंतर संशयिताचा फोन बंद 


अवाना यांनी होकार दिल्यावर गुजराथीने त्यांना एक फॉर्म आणि प्रति सभासद 3000 रुपये भरण्यास सांगितले. अवाना यांनी त्यांचा मुलगा हिमांशू चौधरी यांच्या नावे फॉर्म भरून आधार कार्डासह 6000 रुपये पेटीएमद्वारे पाठवले. पैसे दिल्यानंतर अवाना यांनी पावती मागितली, परंतू गुजराथीने टाळाटाळ केली. यानंतर गुजराथीचा फोन बंद झाला आणि संपर्क तुटला. 


शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 


अवाना हे शिर्डीत आल्यावर त्यांनी संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांना हा प्रकार सांगितला. संस्थानची सभासद होण्याची अशी कोणतीही योजना नसल्याचे माळी यांनी यावेळी सांगितले. यानंतर अवाना यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अवाना यांनी अमोल गुजराथी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.



इतर महत्त्वाच्या बातम्या 


Ahilyanagar News : 'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही', नवरदेवानं मोडलं लग्न; नवरीनं उचललं टोकाचं पाऊल, अहिल्यानगर हादरलं!


Nashik Crime : हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना