Alibaug Vidhansabha Election : अलिबाग विधानसभेच्या (Alibaug Vidhansabha) उमेदवारीसाठी माजी आमदार पंडीत पाटील (Pandit Patil) यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. पंडीत पाटील यांनी शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या अपरोक्ष पत्रकार परिषद घेऊन उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळं शेतकरी कामगार पक्षात विधानसभेच्या उमेदवारीवरुन गृह युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जातेय. पंडीत पाटील यांनी माजी आमदार जयंत पाटील आणि चित्रलेखा पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका देखील केलीय.
जयंत पाटील हे स्वनिर्णय घेऊ शकत नाहीत, पक्षात अनेक ज्येष्ठ सक्षम नेते
शेतकरी कामगार पक्ष हा कोणत्या कुटुंबांचा पक्ष नाही, कार्यकर्ते ठरवतील उमेदवार कोण? मात्र कोण एक व्यक्ती उमेदवारीबाबत ठरवू शकत नाही अशा शब्दात पंडित पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. जयंत पाटील हे स्वनिर्णय घेऊ शकत नाहीत, पक्षात अनेक ज्येष्ठ सक्षम आहेत असं म्हणत पंडीत पाटील यांनी जयंत पाटील यांना टोला लगावला. रील्स स्टार आणि फेसबुक स्टार यांना राजकारण कितपत कळतं असं म्हणत जयंत पाटील यांच्या स्नुशा चित्रलेखा पाटील यांना सुद्धा पंडीत पाटील यांनी टोला लगावला. फेसबुक आणि रिल्सद्वारे आमदार होता येत नाही असंही ते म्हणाले.
ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी कामगार पक्षात घरगुती कलह
ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी कामगार पक्षात घरगुती कलह सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अलिबाग मुरुड मतदारसंघाच्या उमेदवारीवरून पाटील घराण्यात नक्की कोणाला मिळणार उमेदवारी याची सध्या चर्चा सुरु आहे.
लिबाग मुरुड मतदार संघाच्या उमेदवारी बाबत मोठा पेच
आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्ष, नेतेगण निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चे बांधणी करतायेत. रायगड मध्ये एकेकाळी आपली संघटनात्मक मजबूत पकड असलेला शेतकरी कामगार पक्षही या विधानसभा निवडणुकीत नशीब अजमावतोय. सत्यशोधक चळवळीतून निर्माण झालेल्या शेकापला क्रांतिकारी, लढाऊ आणि पुरोगामी विचारांचा वारसा आहे. आप्पासाहेब नारायण नागु पाटील, प्रभाकर पाटील, दत्ता पाटील , मोहन पाटील, गणपतराव देशमुख, मिनाक्षीताई पाटील या दिग्गज नेत्यांनी शेकापच अस्तित्व आजवर अबाधित ठेवण्यात यश मिळवले. मात्र मध्यंतरी च्या काळात शेकापला घरघर लागल्याची स्थिती निर्माण झाली. शेकापक्षाचा ढासळता बुरुज सावरण्यासाठी आजचे नेते सरसावले. विशेषतः देशात इंडिया आघाडी तर राज्यात महाविकास आघाडी मध्ये महत्वाचा प्रादेशिक घटक पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्ष महत्वाच्या भूमिकेत आहे. मात्र रायगडात अलिबाग मुरुड मतदार संघाच्या उमेदवारी बाबत मोठा पेच आणि सभ्रम निर्माण झालाय.
जयंत पाटील काय भूमिका घेणार?
या विधानसभा उमेदवारीची माळ शेकापचे वरिष्ठ नेते कुणाच्या गळ्यात घालणार हा प्रश्न असताना पाटील कुटुंबात उमेदवारीच्या मुद्द्यावर धुसपूस सुरु असल्याची बाब समोर येतेय. शेकापचे माजी आमदार पंडित पाटील, तर शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, तसेच आस्वाद पाटील हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळं शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील हे अंतर्गत वादावर काय भुमिका घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
महत्वाच्या बातम्या: