रत्नागिरी : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपुष्टात आला असून आता घरोघरी जाऊन उमेदवार व कार्यकर्ते प्रचारासाठी जोमाने फिरत आहेत. मात्र, याच प्रचारात रात्रीस खेळ चाले, असे काहीचे चित्र दिसत आहे. 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असून महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेवारांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत झडत आहेत. त्यातच, रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg) लोकसभा मतदार संघामध्ये प्रचार अंतिम टप्प्यामध्ये सुरु असून राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये जोरदार पैशाचे वाटप करीत असल्याचे निदर्शनास येताच आमदार डॉ.राजन साळवी (Rajan Salavi) यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन सदर करत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे, राज्याचं लक्ष लागलेल्या या मतदारसंघातील निवडणुकीवर आता आयोगाचीही करडी नजर राहिल, असे दिसून येते. 


रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात केंद्रीयमंत्री नारायण राणे व विनायक राऊत यांच्यात फाईट आहे. राणेंसाठी कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभा घेऊन राणेंना विकासाची दृष्टी असल्याने त्यांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी भाजपवर गंभीर आरोप करत निवडणूक आयोगाला पत्र दिलंय. भाजप पक्षामार्फत तुळसुंदे, कुवेशी, जैतापूर, माडबन, मिठगवाणे व संपुर्ण राजापूर तालुक्यामध्ये भाजप या पक्षाचे काही अनोळखी व्यक्ती स्थानिक व्यक्तींच्या सहाय्याने मतदारांना भुलविण्यासाठी व लोकसभेच्या निवडणूकीमध्ये भाजपला मतदान करण्यासाठी मतदारांवार जबरदस्तीने दबाव आणुन पैसे वाटप करीत आहेत. तसेच मतदार पैसे घेत नसला तरी त्याला जबरदस्तीने पैसे देऊन त्यांची सही घेतली जात असल्याचे निदर्शनास आले आले असून अशा प्रकारे मतदारांवर दबाव टाकत असुन आचारसंहितेचा भंग केला जास असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.  


आमदार साळवी यांनी मतदारसंघात भाजपा उमेदवाराला मत मिळवून देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं म्हटलं. तसेच पर जिल्हयातील अनोळखी वाहनांमधुन पैसे येत असून त्यांची देखील सखोल चौकशी करण्यात यावी व  पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार आमदार डॉ.राजन साळवी यांनी दिली आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा हायव्होल्टेज मतदारसंघ असून भाजपाच्या राणेंना शिवसेनेच्या विनायक राऊतांचं आव्हान आहे. त्यामुळे, भाजप व शिवसेना दोघांचीही प्रतिष्ठा येथील मतदारसंघात पणाला लागली आहे.


हेही वाचा


काँग्रेस उमेदवारासाठी पैशांचं वाटप, 5 जणांना अटक; पोलिसांकडून 20 लाखांची रोकड जप्त