रायगड : मला तुमच्या सुरक्षेची गरज नाही, मला जनतेचं सुरक्षा कवच आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर तोफ डागली आहे. आपली घोषणा, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, ही 4 जूनला कळली पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचं मोदींवरील कर्ज महाराष्ट्राची जनता व्याजासकट कर्ज परत करणार, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. रविवारी रायगड मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार घणाघाती टीका केली आहे.


मला तुमच्या सुरक्षेची गरज नाही


आयपीएलसारख्या बोल्या आता राजकारणात लागताय, जो येथे होता तो दुसऱ्या टीममध्ये जातो, तसंच सध्या राजकारणात झालं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता माझ्याबद्दल त्यांचं प्रेम जागृत झालं. मला तुमच्या सुरक्षेची, चौकशीची गरज नाही, मला हे जनतेचे सुरक्षा कवच आहे, त्यांनी मला ऑपरेशनचा सल्ला दिला होता म्हणे. मोदी साहेब माझी आस्थेने चौकशी करत होतात तर तुमच्या चेल्या-चपट्याना माहित नव्हतं का, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.


आता महाराष्ट्राची जनता कर्ज व्याजासकट परत करणार


मी जेव्हा रुग्णालयात होतो, तेव्हा आमच्या गद्दारांसोबत कोण बोलीचाली करत होतं. बाळासाहेब ठाकरेंचं माझ्यावर कर्ज आहे म्हणतात, आता महाराष्ट्राची जनता व्याजासकट कर्ज परत करणार आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही नंगा नाच करत आहात. मोदींवर आम्ही खूश आहोत, हे जनतेने सांगावं, मी त्यांचा प्रचार करेल. शाह म्हणतात, मला आव्हान देताय. मला प्रश्न विचारतायत. तुम्ही महागाईवर बोला, जनतेच्या प्रश्नावर बोला. कोण किती खोटं बोलताय, हे कळेल, असं म्हणत उद्दव ठाकरेंनी अमित शाहांवरही निशाणा साधला आहे.


राजकारणात आता आयपीएलसारख्या बोल्या


उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मोदी आणि शाह यांनी आपण होतो, त्यांच्यासोबत तेव्हा महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलं.  आता मोदी-शाह महाराष्ट्रात फिरतायत, रायगडकर दोन चक्रीवादळाचा सामना करणारे आहेत, आता ही दोन वक्रीवादळं फिरताय, या वादळाला घाबरणार नाही. शिवरायांनी आपली राजधानी रायगड केली का निवडली असेल? कारण या मातीचा गंध त्यांना माहित असेल. 


महाराष्ट्राला डाग लावणाऱ्यांसोबत पुन्हा जाणार नाही


कितीही दरवाजे आता उघडा मी आता कधीही सोबत येणार नाही. दरवाजे उघडले तरी तुम्ही आता तिथे असणार का? ज्या महाराष्ट्राला तुम्ही डाग लावला. त्या डाग लावणाऱ्यांसोबत कधीही बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र जाणार नाही. 2014 साली मला राजनाथ सिंह यांचा फोन आला होता, पार्लिमेंटरी बोर्डची बैठक आहे, मोदी यांचं नाव आम्ही पंतप्रधान पदासाठी समोर करतोय. मी तेव्हा अडून राहिलो असतो, पण मी तसं केलं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.


युती तुटली तेव्हा का विचारपूस केली नाही?


2014 ला युती तुटली तेव्हा तुम्ही आस्थेने विचारलं नाही, क्या गडबड है? खडसे यांनी सांगितलं की, वरुन आदेश आलाय, युती तोडावी लागेल. बुरसटलेले गोमूत्र धारी हे तुमचे विचार आहेत. 400 पार जर हे झाले आणि बुरसटलेले गोमूत्रधारी वृत्ती समोर आली तर मी आणि मीच, असं वातावरण असेल, असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.  


तुमचे शाह जादे बीसीसीआयवर


आता राहुल गांधींना शहजादे म्हणतात, पण तुमचे शाह जादे, जय शाह जे बीसीसीआयवर बसले आहे, तो जरा जादाच आहे. तुम्ही आल्यानंतर सगळं बंद करताय. एअर ट्राफिक बंद, दुकान बंद. पुण्यात मोदी आले तेव्हा छावणी तयार केली होती आणि जनतेचे हाल. जनता माझे निवडणूक रोखे आहेत, हे सगळे भगवे रोखे आहेत.



महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : राज ठाकरेंना मोठा धक्का! तिकडे नारायण राणेंचा प्रचार, इकडे मनसे सरचिटणीसाचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश