नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा (NCP Office) वाद तापल्याचे पाहायला मिळत आहे. विधिमंडळ परिसरात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यालयातील शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) प्रत्युत्तर असणारे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या नावाची लावण्यात आलेली पाटी काही तासातच पुन्हा काढण्यात आली आहे. काल या ठिकाणी अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) प्रतोद अनिल पाटील (Anil Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाची पाटी लावण्यात आली होती. त्यानंतर रात्रीत जितेंद्र आव्हाड यांच्या देखील नावाची याठिकाणी पाटी लावण्यात आल्याने कार्यालय नेमकं कुणाला मिळाला याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी काढून टाकण्यात आल्याने, हे कार्यालय अजित पवार गटाला मिळालं का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.


हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कार्यालय नेमके कुणाचे यावरून चर्चा रंगताना पाहायला मिळत होती. कारण अजित पवार गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या नावाची पाटी कार्यालयाला लावण्यात आली होती. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दाखवताच शरद पवार गटाचे प्रतोद असणारे जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची देखील पाटी रात्रीतून लावण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा आव्हाड यांच्या नावाची पाटी काढण्यात आली आहे. त्यामुळे, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा वाद तापण्याची शक्यता आहे. 


दोन्ही गटाकडून कार्यालयावर दावा...


याबाबत, अजित पवार गटाच्या वतीने माहिती देण्यात आली की, आम्ही विधानसभा अध्यक्षांना आम्हाला कार्यालय मिळावं यासाठी पत्र लिहिलं होतं. त्यामुळे कार्यालय आम्हाला मिळाला आहे. तर, शरद पवार गटाच्या वतीने सांगण्यात आलं की, मूळ राष्ट्रवादी आम्ही असल्याने आम्ही पत्र लिहिण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कार्यालय हे आमचेच आहे. असे असतानाच आता आव्हाड यांच्या नावाची पाटी काढण्यात आली असून, अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचीच पाटी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर पाहायला मिळत आहे. 


नवाब मलिक देखील हजर राहणार...


आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरवात असून, आमदार नवाब मलिक देखील यावेळी हजेरी लावणार आहेत. नवाब मलिक हे सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहे. तर, अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी काल रात्रीच ते नागपुरात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे, अधिवेशनात मलिक हे अजित पवार गटाच्या आमदारांसोबत बसतात, की शरद पवार गटाच्या आमदारांसोबत बसतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे.  विशेष म्हणजे, आपण तटस्थ आहोत अशी भूमिका मलिक यांनी यापूर्वी जाहीर केली आहे. मात्र, नवाब मलिक आज विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार असल्याने ते कोणत्या गटात सहभागी होणार? याबाबत पुन्हा चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Assembly Session 2023 LIVE Updates : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, सर्व अपडेट्स एका क्लिकवर...