Lok Sabha Election 2024 : अहमदनगर : सध्या लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा पाहायला मिळत आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Thackeray Group) राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणात एकरी उल्लेख केल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल काजळे यांनी याबाबत शुक्रवारी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा निवडणूक शाखेकडून राऊत यांच्यावर कारवाईबाबत कोतवाली पोलिसांना प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानं राऊत यांच्या विरोधात भादंवि कलम 171(क) 506 आणि लोकप्रतिनिधी अधिनियम 123 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


प्रकरण नेमकं काय? 


चौथ्या टप्प्यात नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघाची (Lok Sabha 2024) निवडणूक पार पडली. त्यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्वत: संजय राऊत मैदानात उतरले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ अहमदनगर शहरातील क्लेराब्रूस मैदानावर 8 मे रोजी सायंकाळी सभा झाली होती. या सभेत ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या जन्मस्थळाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यावेळी त्यांनी मोदी यांचा एकरी उल्लेख केला होता. 


महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत बोलताना संजय राऊत यांनी औरंगजेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म एकाच गावात झाला होता, असा दावा केला होता. एका औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडलं तर तू कोण? असा पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख देखील संजय राऊत यांनी केला होता.


काय म्हणालेले संजय राऊत? 


खासदार संजय राऊत म्हणाले होते की, "आपल्याला इतिहासामध्ये जावं लागेल. औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला होता, तेथील माती औरंगजेबाची माती आहे. त्या मातीतील हे दोन व्यापारी आहेत. औरंगजेबाचा जन्म आणि नरेंद्र मोदी यांचा जन्म दावत मध्ये झाला आहे. औरंगजेब तिथे जन्माला आला आहे. त्यामुळे आपल्याशी औरंगजेब्याच्या वृत्तीने हे दोन व्यापारी वागत आहेत. एका औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडला आहे. तर तू कोण?"