मुंबई  : लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात 5 टप्प्यात मतदान झालं. 20 मे रोजी मुंबईसह एकूण 13 मतदारसंघातील मतदानानंतर (voting) राज्यातील निवडणुकांची सांगता झाली. त्यामुळे, निवडणूक मतदानानंतर सर्वांनाच उत्सुकता लागली आहे, ती 4 जून रोजी येणाऱ्या निकालाची. मात्र, मतदानाचा शेवटचा टप्पा आज पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर येत आहेत. या एक्झिट पोलमधून राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती (Mahayuti) यांच्यात कोणाचं पारडं जड राहणार हे पाहता येईल. राज्यात यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून लोकसभा निवडणुकीत प्रथमच शिवसेना (Shivsena) विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत पाहायला मिळाली. शिवसेनेतील फुटीमुळे ही लढत उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंसाठी (Eknath Shinde) प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यामुळे, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीला मोठा धक्का बसणार असा अंदाज आहे. 


लोकसभा निवडणुकांत शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यानुसार महायुतीला 24 तर मविआला 23 जागांचा अंदाज असून एक जागा अपक्षाच्या खात्यात दर्शवत आहे. त्यामध्ये, भाजप 17, तर शिंदे गटाला 6 जागांचा अंदाज असून अजित पवार गटाला केवळ एका जागेवर विजय शक्य असल्याचे अंदाजातून दिसून येते. तर, मविआमध्ये काँग्रेसला 8, ठाकरे गटाला 9 जागांचा अंदाज असून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अपक्षालाही एका जागेवर विजय मिळणार असून सांगलीची जागा अपक्ष उमेदवार जिंकू शकतो, असा अंदाज आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात महायुतीसह भाजपला मोठा तोटा असल्याची शक्यता आहे. दरम्यान, 2019 ला 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 17 च जागा शक्य असून शिंदे गट विद्यमान 13 खासदारांवरुन 6 जागांपर्यंत घसरणार असल्याचे दिसून येते. दरम्यान, हा केवळ अंदाज असून खरा निकाल 4 जून रोजीच लागणार आहे. 


महायुतीच्या जागावाटपात शिंदेंच्या शिवसेनेला 15 जागा मिळाल्या होत्या. तर, महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरेंच्या शिवसेनेला 21 जागा मिळाल्या. त्यामुळे, दोन्ही शिवसेनेपैकी कोणती शिवसेना लोकसभा निवडणुकीत सरस ठरणार याची उत्कंठा सर्वांनाच लागली होती. शिंदेंकडे असलेल्या 15 जागांपैकी 13 जागांवर त्यांचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे, त्यांचं पारडं जड होतं. मात्र, शिवसेनेतील फुटीमुळे उद्धव ठाकरेंना सहानुभूती असल्याचं निवडणूक प्रचारांमध्ये दिसून आलं. राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजेच ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना आहे. त्यामुळे, या निवडणुकीतून मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 


शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजेच शिंदे विरुद्ध ठाकरे लढती


1) उत्तर पश्चिम मुंबई - रवींद्र वायकर (शिवसेना) विरुद्ध अमोल कीर्तीकर (ठाकरे गट)


2) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट)


3) दक्षिण मुंबई - यामिनी जाधव (शिवसेना) विरुद्ध अरविंद सावंत (ठाकरे गट)


4) बुलडाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना) विरुद्ध नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट)


5) यवतमाळ - वाशिम राजश्री पाटील (शिवसेना) विरुद्ध संजय देशमुख (ठाकरे गट)


6) हिंगोली - बाबूराव कदम (शिवसेना) विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर (ठाकरे गट)


7) औरंगाबाद - संदिपान भुमरे (शिवसेना) विरुद्ध चंद्रकांत खैरे (ठाकरे गट)


8) नाशिक - हेमंत गोडसे (शिवसेना) विरुद्ध राजाभाऊ वाजे (ठाकरे गट)


9) शिर्डी - सदााशिव लोखंडे (शिवसेना) विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट)


10) मावळ - श्रीरंग बारणे (शिवसेना) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील (ठाकरे गट)


11) कल्याण - श्रीकांत शिंदे (शिवसेना) विरुद्ध वैशाली दरेकर (ठाकरे गट)


12) ठाणे - नरेश म्हस्के (शिवसेना) विरुद्ध राजन विचारे (ठाकरे गट)


13) हातकणंगले - धैर्यशील माने (शिवसेना) विरुद्ध सत्यजीत पाटील (ठाकरे गट)


दरम्यान, शिंदेंकडील 15 मतदारसंघांपैकी उर्वरीत 2 मतदारसंघामध्ये शिंदेकडे रामटेक आणि कोल्हापूर हे दोन मतदारसंघ आहेत, जिथे शिंदेंचा सामना काँग्रेसविरुद्ध आहे. तर, अमरावती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर, सातारा हे 4 मतदारसंघ भाजपकडे गेले आहेत. जिथे 2019 साली शिवसेनेने आपले उमेदवार दिले होते.


महाराष्ट्रात कोणी किती जागा लढल्या


महायुती 


भाजपा - 28
शिवसेना (शिंदे गट) - 15
राष्ट्रवादी (अजित पवार) - 4
रासप ( महादेव जानकर) - 1


महाविकास आघाडी


शिवसेना (उद्धव ठाकरे) - 21
राष्ट्रवादी (शरद पवार) - 10
काँग्रेस    - 17


एबीपी सी वोटर एक्झिट पोल


महायुती
भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1 


महाविकास आघाडी
ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1


एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12


 



(Disclaimer : ABP C व्होटर एक्झिट पोल सर्वेक्षण 19 जून ते 1 जून 2024 दरम्यान घेण्यात आला. त्याची सँपल साईज ही 4 लाख 31 हजार 182 इतकी आहे आणि हे सर्वेक्षण सर्व 543 लोकसभेच्या जागांवर करण्यात आले. त्यामध्ये देशातील 4,129 विधानसभा जागांचा समावेश आहे. ABP C व्होटर सर्वेक्षणाचे त्रुटीचे मार्जिन राष्ट्रीय स्तरावर +3 आणि -3 टक्के तर प्रादेशिक स्तरावर +5 आणि -5 टक्के इतकं आहे.)