Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान चालू आहे. लवकरच मतदानाची ठराविक वेळ संपणार असून त्यानंतर वेगवेगळ्या माध्यम संस्थांचे एक्झिट पोल समोर येतील. या एक्झिट पोलच्या माध्यमातून देशात कोणाची सत्ता येणार? कोणाला किती जागा मिळणार? याचे अंदाज बांधले जातील. दरम्यान, या निवडणुकीत मराठवाड्यातील काही जागा चांगल्या चर्चेत राहिल्या. यात जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धारावीश अशा जागांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक वर्षांपासून मराठवाड्यात पत्रकारिता करणाऱ्या स्थानिक पत्रकारांनी या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचा अंदाज सांगितला आहे. 


पत्रकारांचे मत काय? 


बीडची निवडणूक सुरुवातीला एकतर्फी वाटत होती. पण नंतर ती अटीतटीची झाली. बीडचा निकाल पूर्वीप्रमाणेच लागणार. म्हणजेच ही जागा भाजपच्याच खिशात जाणार असं वाटतंय. या जागेवरून पंकजा मुंडे विजयी होण्याची शक्यता आहे, असे मत मराठवाड्यातील पत्रकार वसंत मुंडे यांनी व्यक्त केले आहे. 


महायुतीला तीन आणि महाविकास आघाडीला चार जागा?


एकूण आठ जागांपैकी छत्रपती संभाजीनगरमधील निकालाबाबत अद्याप काही सांगता येणार नाही. पण अन्य सात जागांपैकी 3 जागा या महायुतीला तर 4 जागा या महाविकास आगाडीला मिळण्याची शक्यता आहे. जालना, बीड, लातूर या जागा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे. तर धाराशीव, नांदेड, परभणी, हिंगोली या जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय होण्याची शक्यता आहे, असे एका पत्रकाराचे मत आहे, असा थेट अंदाज दैनिक लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार सुहास सरदेशमुख यांनी व्यक्त केला. 


नांदेड, धाराशीवमध्ये महाविकास आघाडी?


यावेळी मराठवाड्यातील चित्र फार भिन्न पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची ताकद ही फक्त बीडपर्यंत दिसत आहे. बीडमध्येही चुरशीची लढत होईल आणि तिथे पंकजा मुंडे निवडून येतील असं वाटतंय. बाकीच्या सात जागांवर महाविकास आघाडीचा विजय होण्याची शक्यता आहे. जालन्यात सत्ताविरोधी जनमत तयार झाल्यामुळे भाजपचे अंबादास दानवे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.  अशोक चव्हाण यांच्यासाठी नांदेडची जागा प्रतिष्ठेची होती. मात्र येथे काँग्रेसच निवडून येण्याची शक्यता आहे.अशोक चव्हाण भाजपत गेले नसते तर कदाचित चिखलीकर निवडून आले असते. धाराशीवमध्ये ओमराजे निंबाळकर प्रसिद्ध आहेत. त्या मतदारसंघात ऐनवेळी अर्चना पाटील यांना तिकीट देण्यात आलं. लातूरमध्ये यावेळी शिवाजी काळगे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. यावेळी शेतकऱ्यांवर झालेला अन्याय, पंतप्रधानांची विधानं यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ. संजीव उन्हाळे यांनी व्यक्त केले.



जालन्यात चुरशीची लढत?


रावसाहेब दानवे सुरुवातीला प्रचारात आघाडीवर होते. ते पाच वेळा खासदार राहिलेले आहेत. पण शेवटच्या टप्प्यात दलित, मुस्लीम, मराठा मतं कल्याण काळे यांच्याकडे वळताना दिसले. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्यापुढे कल्याण काळे यांच्या रुपात फार मोठे आव्हान आहे, असे जालन्यात गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण राऊत यांचे मत आहे.


हेही वाचा : 


Exit Poll 2024 LIVE Updates : मराठवाड्यातील जागांवर कोण बाजी मारणार, स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?


Narayan Rane : निकालाआधी धाकधूक वाटत नाही, उत्सुकता कशाला मी विजयी होणार, कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली; नारायण राणेंना कॉन्फिडन्स