सोलापूर - राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो, हे यंदाच्या लोकसभा निवडणुकांमधील (Loksabha Election) अनेक घटनांवरुन दिसून येत आहे. कारण, गेल्या 30 वर्षाचे वैर सामावून शुक्रवारी माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील (Jaysingh Mohite patil) गट व उत्तम जानकर गट या दोन शक्ती एकत्र आल्या. मात्र, कार्यकर्त्यांच्या मनातील शंका न संपल्याने कार्यकर्त्यांनी थेट जयंत पाटील यांच्यासमोरच जयसिंह मोहिते पाटील आपल्या नेत्याच्या राजकीय भविष्याबद्दल जाब विचारला. त्यावेळी या गोष्टी सभेत बोलायच्या नसतात असे सांगून जयसिंह मोहिते पाटील यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते आक्रमक झाल्याने तुमची व उत्तम जानकर (Uttam jankar) यांची खात्री कोण घेणार, असा सवालही कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे, मोहिते जानकर युतीमध्ये अजूनही कार्यकर्त्यांचे मनोमिलन होण्यास वेळ जाणार असेच चित्र दिसून येते. पण, तुर्ताच जयंत पाटलांनी मध्यस्थी करुन मार्ग काढला. त्यामुळे, शरद पवारांकडून एकप्रकारे उत्तम जानकरांना मोठं गिफ्टच मिळाल्याचं दिसून येतं. 


माळशिरस तालुक्याचे सर्वेसर्वो म्हणून ज्याच्याकडे पहिले जाते ते जयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळेच धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करीत तुतारी हाती घेतली आहे. यावेळी जयसिंह मोहिते पाटील याना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून सभास्थळी आणल्यावर भाषणात बोलताना मी 30 वर्षानंतर पूर्वीच्या कट्टर वैऱ्याच्या स्टेजवर आल्याचे त्यांनी म्हटले. मी जो शब्द देतो तो कायम पाळतो, आता दोन्ही गटाने एकत्रित काम करुया, असे म्हणत अकलूजमधील एका दारुड्याचं उदाहरणही दिलं. एका दारुड्या हमालास दारू सोड असा सल्ला दिला होता, त्याने दारी सोडल्यावर त्या हमालाला थेट जिल्हा परिषद सदस्य केले आणि नंतर त्यास जिल्हा परिषदेत समाजकल्याण विभागाचा सभापती केल्याची आठवण करुन जयसिंह मोहिते पाटलांनी सांगितली. 


कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा


जयसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात माळशिरस विधानसभेसाठी उत्तम जानकर यांना मदत करण्याची स्पष्ट वक्तव्य न केल्याने काही जानकर कार्यकर्ते आक्रमक झाले होते.जयंत पाटील भाषणाला उभारल्यावर या कार्यकर्त्यांनी थेट जयसिंह मोहिते पाटील यांना स्पष्ट सांगा असा आग्रह धरला.त्यामुळे, कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी या गोष्टी अशा जाहीर बोलता येत नाहीत, पण मी उत्तमराव यांना शब्द दिला आहे, तो शब्द मी पाळणार असल्याचे जयसिंह यांनी म्हटले. मात्र, यावरही कार्यकर्त्यांचे समाधान न झाल्याने जयसिंह मोहिते पाटील यांनी आपली भूमिका मांडताना मी हमी देतो पण मला तुमच्याकडूनही हमी पाहिजे असल्याचे म्हटले.दरम्यान, यानंतरही कार्यकर्ते शांत होत नसल्याचे पाहून जयसिंह मोहिते पाटील यांनी थेट उत्तमरावाची जबाबदारी कोण घेणार असा सवाल केला. सभेच्यास्थळी परिस्थिती चिघळत चाललेली पाहून अखेर यात भाषणाला उभे असणाऱ्या जयंत पाटील यांनी मध्यस्थी करीत मी येथे या विषयावर प्रकाश पाडायला उभा आहे, असे सांगत माझ्या भाषणात स्पष्ट न झाल्यास तुम्ही परत बोला असे म्हणत विषयावर पडदा टाकला अन् उत्तम घोषणाच केली. 


आत्ताच एबी फॉर्म देतो...


जयसिंह मोहिते पाटील आणि जानकर कार्यकर्ते यांच्यातील बाचाबाचीनंतर स्वत: जयंत पाटलांनी मध्यस्थी करुन उमेदवारीची घोषणाच केली. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात उत्तम जानकर याना माळशिरस विधानसभेची उमेदवारी देणारा मीच आहे आणि तुम्ही सांगत असाल तर आताच त्यांना विधानसभेचा AB फॉर्म देतो, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे, नेत्याचे मनोमिलन तरी झाले. मात्र, कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडायला थोडा वेळ जाईल अशीच परिस्थिती माढा, माळशिरस मतदारसंघात आहेच