Khasdar Shrirang Barne on NCP : महाराष्ट्रात महायुतीच्या नावाने एकत्र आलेले भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, राज्यातले हे तीन मित्र सत्ताधारी बाकांवर मांडीला मांडी लावून बसतात खरे, मात्र जेव्हा गोष्ट दिल्लीत जाते तेव्हा राज्यातले हे मित्र भाजपच्या दृष्टीने गौण ठरतात का? त्याला कारण ठरलंय एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा, राज्यात मानाचं पान मिळवणाऱ्या शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांना केंद्रात सत्तेत न्याय्य वाटा मिळाला नाही अशी चर्चा सुरू झालीय. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसला न्याय द्यायला हवा होता, असेही ते म्हणाले आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांनी एबीपी माझासोबत बोलताना मनातील खदखद व्यक्त केली. त्याशिवाय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठं वक्तव्य केलेय. भाजपसोबत जाताना अजित पवारांनी कुटुंबाचा रोषही घेतला 


अजित पवारांना मंत्रिपद का नाही दिलं ? नेमकी काय घडामोड होती ? 


खरंतर याबाबतीमध्ये मी सांगेल की भारतीय जनता पक्षासाठी माननीय अजितदादा पवार यांनी खूप मोठी भूमिका की या सगळ्या घडामोडीमध्ये घेतलेली आहे. कुटुंबासोबत देखील या सगळ्या घडामोडीमध्ये रोष घेतला आहे. मला असं वाटतंय की अजितदादाला देखील न्याय मिळायला हवा. तशी भूमिका ही भारतीय जनता पक्षाने घ्यायला पाहिजे होती, असे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले. 



अजित पवारांना डावलले ?


अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 खासदार निवडून आलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 5 जागा लढल्या. त्यांना एका जागेवर विजय मिळाला तर स्ट्राईकरेट आहे 25 टक्के...भाजपने केवळ १ राज्यमंत्रीपद देऊ केलं. ते राष्ट्रवादीने नाकारलं. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचा खासदार नाही. मात्र भाजपचे आणखी एक मित्र जीतनराम मांझी यांच्याबाबत वेगळा न्याय दिसला. जीतनराम मांझी यांच्या रूपात हिंदुस्तान आवाम मोर्चाचाही एक खासदार निवडून आलाय. मांझी यांचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलंय..  


शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळायला हवं होतं -


देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांचं मंत्रिमंडळ स्थापित झाले आहे. या निवडणुकीचा जर विचार करता शिवसेना पक्ष जुना साथी आहे. एनडीएचा जुना साथी म्हणून शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्री मिळावे ही माफक आपेक्षा होती.  चंद्राबाबू नायडू यांचे सोळा खासदार निवडून आले, त्याचबरोबर नितेश कुमार यांचे 12 खासदार निवडून आले. त्या खालोखाल शिवसेना पक्षाचे सात खासदार निवडून आले. चिराग पासवान यांचे पाच खासदार निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. कुमारस्वामी यांचे दोन खासदार कर्नाटकातून निवडून आले, त्यांना एक कॅबिनेट मंत्रिपद दिले. त्याचबरोबर बिहार मधून जितन मांझी एकटे निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले. तर शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री मिळावे, अशी आमची अपेक्षा होती. कॅनिबेनट मंत्रिपदाची शपथ आमच्या खासदाराने घेतली असती तर आम्हाला समाधान मिळाले असते, असे श्रीरंग बारणे म्हणाले.


आणखी वाचा :


1 खासदार असलेल्या मांझींना कॅबिनेट, 7 खासदार असलेल्या शिवसेनेला एकही का नाही? श्रीरंग बारणेंचा सवाल, केंद्रातील कॅबिनेटवरुन खदखद