Amit Shah & Eknath Shinde meeting in Delhi: राज्यात मराठीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असताना आणि विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बुधवारी संध्याकाळी अचानक दिल्लीत गेले होते. दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी अनेक वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शाह (Amit Shah) यांचीही एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी गुप्त राजकीय खलबते झाली होती. यावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा (Thackeray Brand) नेमका प्रभाव कितपत आहे, याविषयी माहिती एकनाथ शिंदेंकडून जाणून घेतल्याची सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात. त्यामुळे काय इलेक्शन मोडमध्ये असणारा आणि सतत राजकीय डावपेच आखणारा भाजप पक्ष सावध झाला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यास महाराष्ट्रात महायुतीला किती फटका बसू शकतो, याचे अंतर्गत सर्वेक्षण भाजपने करवून घेतले आहे. त्या सर्व्हेत नेमकी काय माहिती समोर आली, हे अमित शाहांनी शिंदेंना सांगितल्याचे समजते.

ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांना कसे रोखायचे? त्यासाठी वेळ पडल्यास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणखी लांबणीवर टाकायच्या का, त्याचे काय परिणाम होतील, या सगळ्याबाबत अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय खल झाला. तसेच ठाकरे बंधूंना थेट आव्हान दिले आणि लक्ष्य केले तर त्यामुळे मराठी मतदारांमध्ये काय प्रतिक्रिया उमटेल? मराठी-हिंदी वादामुळे मुंबईतील अमराठी मतदारांचे ध्रुवीकरण होऊन ते महायुतीच्या पाठीशी उभे राहतील का, याचे विश्लेषण अमित शाहांकडून सुरु झाले आहे. राज ठाकरे यांनी त्रिभाषा धोरण आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन सरकारची कोंडी केली होती. त्यावर आता मनसे-ठाकरे गटाला शह देण्यासाठी काऊंटर नरेटिव्ह कसा सेट करायचा, याबाबतही शिंदे आणि अमित शाहांची दीर्घ चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Eknath Shinde: महायुतीत वाद टाळा; अमित शाहांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीमधील अंतर्गत वादाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबतही दिल्लीत अमित शाह आणि शिंदेंच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. शिंदे गटाच्या काही आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गदारोळ झाला होता. याबाबत भाजपने दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. त्यामुळे अमित शाह यांनी, महापालिका निवडणुकीपर्यंत हे प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्या. महायुती एकसंध आहे, हा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे, अशी सूचना एकनाथ शिंदे यांना केल्याचे समजते.

आणखी वाचा

एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर घडामोडींना वेग; शिवसेना पक्ष अन् चिन्ह सुनावणीच्या निमित्ताने वकिलांशी चर्चा, राजनाथ सिंहांनाही भेटले