Eknath Shinde : लाडक्या बहिणींचा लाडका सख्खा भाऊ म्हणून माझी ओळख निर्माण झाल्याचे वक्तव्य एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं. ही ओळख सर्व पदापेक्षा मोठी वाटते. मी समाधानी आहे. नाराज होऊन रडणार नाही, लढून काम करणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी लोकप्रियता मिळवण्यासाठी काम केलं नाही. मी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. अडीच वर्षाच्या काळात केंद्र सरकार आमच्या मागे उभे राहिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) आणि अमित शाह यांना फोन केला होता. मी त्यांना सांगितलं की, माझ्यामुळं कोणतीही अडचण होणार नाही. तुम्ही जो निर्णय घ्याल, तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे एकनाथ शिंदे म्हणाले. तुमच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा असेल असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
महायुतीला अतिशय मोठा विजय मिळाला
महायुतीला अतिशय मोठा विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली आहेत. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आहे. त्यामुळं आम्हालामोठा विजय मिळाला. हा जनतेचा विजय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मी पहाटेपर्यंत काम करत होते. दोन तीन तास झोप घ्यायचो असे एकनाथ शिंदे म्हणाले. 80 ते 90 सभा मी घेतल्या. मोठ्या प्रमाणात प्रवास मी केला आहे. मी साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी मुख्यमंत्री म्हणून स्वताला कधीच समजलो नाही. मी कॉमन मॅन म्हणून वागलो असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे गप्प होते. त्यानंतर ते नेमके काय बोलणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. अखेर एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे.
आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासीक
मी गरीब परिवारातून आलो , त्यामुळं मला सगळ्या वेदना समजत होत्या. लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी योजना सुरु केल्या. सरकार म्हणून सर्वसामान्य लोकांना आधार हवा असतो तो आम्ही दिला. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचे विचार घेऊन पुढे गेल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. अमित शाह हे अडीच वर्ष पूर्ण ताकतीनं मागे उभे राहिले. मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांचे आभार. त्यांनी निधी दिली,. पाठबळ दिला असेही एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याचा प्रगतीचा वेग वाढल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासीक असल्याचे शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांचे, सिंचनांचे निर्णय घेतले. राज्य एक नंबरला नेण्याचे काम आम्ही केले आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. सहा महिन्यात आम्ही पहिल्या नंबरला आलो. मतांचा वर्षाव हा जे आम्ही काम केलं, निर्णय घेतले यामुळं झालेला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच एकनाथ शिंदे यांना त्यांची भूमिका जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा महायुतीचचं सरकार स्थापन होणार आहे. मात्र, महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर एकनाथ शिंदे यांनी त्यावर भाष्य केलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी काल महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. मात्र, जोपर्यंत नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यंत्री म्हणून पदभार सांभाळणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभ -दीप निवासस्थानी त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे विविध नेते दाखल झाले आहेत. यामध्ये आमदार दादा भुसे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रताप सरनाईक हे दाखल झाले आहेत.