Eknath Shinde on Shrikant Shinde, Satara : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकतर्फी यश आलंय. महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. दरम्यान, निवडणुकीत यश आलेलं असलं तरी अजून मुख्यमंत्री कोण होणार? आणि महायुतीतील कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार याबाबत कोणतीही स्पष्टता आलेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत बैठकांचा धडाका सुरु आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.


महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षाच्या आलेल्या आहेत, त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार अशा चर्चांनी जोर धरलाय. आता एकनाथ शिंदे यांनी याबाबत भाष्य केलंय. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत शिंदेंना श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद मिळणार का? असा सवाल विचारण्यात आला होता. याबाबत त्यांनी भाष्य केलं आहे. 



श्रीकांत शिंदेंबाबत एकनाथ शिंदे काय म्हणाले?


एकनाथ शिंदे म्हणाले, मोदीजी आणि अमित शाहा  जो निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल, याबाबत मी स्पष्ट केले आहे. गृह खात्याबाबत चर्चा होईल. लोकांना जी आश्वासन दिले आहेत ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.  सर्वात महत्त्वाचं मला काय मिळालं दुसऱ्याला काय मिळालं हे महत्त्वाचं नसून जनतेला काय मिळणार आहे हे महत्त्वाचं आहे. उपमुख्यमंत्रिपद श्रीकांत शिंदेंना मिळणार अशा चर्चा आपण पत्रकारच चर्चा करत असता. या सर्व चर्चा आहेत. एक बैठक अमित भाई यांच्यासोबत झाली आहे. दुसरी बैठक आमची तिघांची होईल. त्यामधून महाराष्ट्राच्या हिताचा योग्य तो निर्णय होईल.


पुढे बोलताना शिंदे म्हणाले,  विरोधक काहीही बोलतात त्यांना काही काम राहिलेलं नाही.  आमच्यामध्ये कोणताही समन्वयाचा अभाव नाही. विरोधकांना काही काम नाही अगदी विरोधी पक्षनेता देखील होता येत नाही. एवढं संख्याबळ आता त्यांचं कमी आहे. झारखंडमध्ये ते जिंकले त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता. लोकसभेमध्ये ते जिंकले त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता. लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग या विजयामध्ये आहे. या भावांनी शेतकऱ्यांनी आम्हाला प्रेम दिलं या सर्वांच्या आशीर्वादामुळे ही निवडणूक आम्ही जिंकलो. फेरमत मोजणी बाबत निवडणूक निवडणूक आयोग निर्णय घेईल. जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम खराब आहे, जेव्हा जिंकता त्यावेळेस ईव्हीएम चांगला आहे, त्यांनी एकच भूमिका घेणे गरजेचे आहे, असंही शिंदे यांनी नमूद केलं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


रक्तानं पत्र लिहल्याने कुणी मुख्यमंत्री होत नसतं, CM पदासाठी आमचं नाव ठरलंय; दानवेंनी स्पष्टच सांगितलं