Eknath Shinde  नागपूर : राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांसाठीची घोषणा पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तर, दिवाळीनंतरच निवडणुकांचे फटाके फुटणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. तसेच, आपल्याला महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्ये (Mahayuti) संधी पाहून, किंवा संधी मिळणार नाही, याचा अंदाज घेऊन उमेदवारांचेही पक्षांतर सुरू आहे. दरम्यान, यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केलं होतं. आता, पुन्हा एकदा त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केलं आहे. त्यामुळे, विधानसभेच्या (Vidhansabha) निवडणुका दिवाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होतील. सन 1999 नंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका एकापेक्षा अधिक टप्प्यात होण्याची यंदा दाट शक्यता आहे. 29 ऑगस्ट रोजी एबीपी माझाने दिलेल्या बातमीवर आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच शिक्कामोर्तब केले आहे. 


सन 2024 उजाडला तेव्हापासून राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका केव्हा होतील ही चर्चा सुरू आहे. सुरुवातीला विधानसभा निवडणुका लोकसभेत सोबतच होतील अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होईल अशी चर्चा सुरू झाली. मात्र, विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात होईल आणि तीही एका टप्प्यात नसून दोन टप्प्यात होईल, अशी बातमी सर्वात आधी एबीपी माझा ने दिली होती. 29 ऑगस्ट रोजी सकाळी एबीपी माझा खात्रीलायक प्रशासकीय सूत्रांच्या आधारे बातमी दिली होती की, राज्यातील विधानसभा निवडणुका 12 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होईल, आणि 1999 नंतर पहिल्यांदाच राज्यात दोन टप्प्यात मतदान होईल. आता, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना माहिती दिली की, राज्यात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होतील. त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीवर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच शिक्कामोर्तब केले आहे... दरम्यान, राज्यात नोव्हेम्बर महिन्यात निवडणुका घेण्यासंदर्भात काही प्रशासकीय, काही राजकीय तर काही सुरक्षा विषयक कारणं आहेत. त्याचा अभ्यास करूनच एबीपी माझाने 29 ऑगस्ट रोजीच निवडणुकांच्या बाबतीत अचूक बातमी दिली होती. 


राज्यात निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर का ?


प्रशासकीय कारण -  
राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये कमी मतदान झालं, त्याचे प्रमुख कारण मतदार याद्यांमधील गोंधळ होता. त्यामुळे प्रशासनाने विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त करणे सुरु केले आहे. चुकांची दुरुस्ती, नव्या मतदारांची नोंदणी, यामुळे राज्यातील मतदार याद्या लवकर पूर्ण झाल्या नाहीत. म्हणून हरयाणाचे निवडणूक महाराष्ट्राच्या आधी होत आहे.


सुरक्षाविषयक कारणं - 


राज्यात गेल्या काही महिन्यात आरक्षण विषयक आंदोलन, उपोषण आणि यात्रानी वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक ठिकाणी नेत्यांना गावबंदी ही झाली. त्यामुळे निवडणूक विषयक तणाव लोकसभेच्या वेळेला संपूर्ण राज्यात खास करून मराठवाड्यात दिसून आला. याशिवाय लव जिहाद सारखे मुद्दे, त्या विरोधात हिंदू संघटनांचे राज्यव्यापी आंदोलन आणि नंतर रामगिरी महाराजांचे वक्तव्य. अशा अनेक कारणांनी राज्य पोलीस दल गुप्तहेर विभाग, निवडणूक आयोग सर्वाना वाटतंय की निवडणूक पूर्ण तयारीनिशी व्हाव्या. म्हणूनच विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात एक नव्हे तर दोन टप्प्यात घेण्याची शिफारस होती. 


राजकीय करणे - 
राज्यातील सत्ताधारी महायुतीला लोकसभा निवडणुकीत धक्का बसला. त्याच्यातून सावरत तडकाफडकीने मतदारांना आकर्षित करणाऱ्या काही योजना महायुतीने जाहीर केल्या. अजूनही काही योजनांची घोषणा होणे अपेक्षित आहे. अशा स्थितीत महायुतीने जाहीर केलेल्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मतदारांपर्यंत पोहोचवल्यानंतर निवडणुकीत जाण्याचे ठरविले.लाडकी बहीण योजनेसारख्या थेट लाभाच्या योजना त्यापैकीच एक प्रमुख कारण आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्ही बाजूला तीन तीन पक्ष असल्याने जागावाटप आधसारखा सोपं राहिलेलं नाही. त्यामुळे दोन्ही आघाड्यांनाही निवडणुका उशिरा झाल्यास आपापसातील वाद सोडवण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो. या सर्व कारणांमुळे दोन्ही पक्ष राजकीय भूमिका काहीही घेत असले तरी निवडणुका उशिरा होत असल्याबद्दल समाधानीच आहे..


महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा -


1995 - 12 फेब्रुवारी आणि 9 मार्च अशा दोन टप्प्यात निवडणुका पार पडल्या...


1999 - 5 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर अशा दोन टप्प्यात मतदान झाले...


2004 - 13 ऑक्टोबर रोजी एका टप्प्यात मतदान पार पडले...


2009 - 13 ऑक्टोबर रोजी एका टप्प्यात मतदान...


2014 - 15 ऑक्टोबर रोजी एका टप्प्यात मतदान..


2019 - 21 ऑक्टोबर रोजी एका टप्प्यातच सर्व 288 जागांसाठी मतदान...


त्यामुळे राज्यात गेल्या काही निवडणुकांपासून एका टप्प्यात मतदानाची परंपरा असली तरी यापूर्वी दोन किंवा त्यापेक्षा अधिक टप्प्यातही मतदान झाले आहे. त्यामुळे विद्यमान राजकीय परिस्थिती आणि सामाजिक वातावरण पाहता राज्यात यंदा दोन टप्प्यात मतदान होईल हेच संयुक्तिक वाटतं आहे. गुप्तहेर यंत्रणेनेही राज्य सरकार व निवडणूक आयोगाला तशीच सूचना दिल्याची माहिती आहे.