Eknath Shinde : राज्यात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पहिली ते चौथीच्या वर्गांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवण्याचा सरकारचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाला असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे. दि. 26 जून रोजी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी, मातोश्रीवर यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार आणि शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समितीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि दीपक पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. यात येत्या 29 जून रोजी एक जाहीर सभा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या सभेत राज्य सरकारने तिसऱ्या भाषेबाबत घेतलेल्या निर्णयाच्या प्रतीकात्मक होळी करण्यात येणार असल्याची माहिती दीपक पवार यांनी दिली होती. दरम्यान, या जाहीर सभेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाही समितीच्या वतीने निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात 29 तारखेला होत असलेल्या जाहीर सभेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीकडून निमंत्रण देण्यात आले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे 29 तारखेला त्रिभाषा सूत्र सक्तीच्या निर्णयाविरोधात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यात उद्धव ठाकरे यांच्यासह इतर पक्षातील नेते सुद्धा निमंत्रित आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुद्धा समितीने निमंत्रण दिलं आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या जाहीर सभेला उपस्थित राहावे, अशी विनंती समितीकडून करण्यात आली आहे.
नेमकं काय म्हटलंय पत्रात?
शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठी अभ्यास केंद्र आणि समिवचारी संस्थांच्या पुढाकाराने तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची स्थापना झाली आहे, हे आपण जाणत असाल. या समन्वय समितीने दिनांक 29 जून रोजी, दुपारी तीन वाजता, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात तिसऱ्या भाषेच्या सक्तीविषयक अन्याय्य शासन निर्णयांची आणि परिपत्रकाची प्रतीकात्मक होळी आणि त्यानंतर जाहीर सभा आयोजित केली आहे.
या कार्यक्रमाला शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, भाकपचे प्रकाश रेड्डी, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, तसेच इतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, समन्वय समितीतील विविध संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, पालक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आपणही या सभेसाठी उपस्थित राहावे अशी आपणास आग्रहाची विनंती. तसेच आपल्या पक्षाचे इतर नेते आणि कार्यकर्ते यांनाही या पत्राद्वारे आमंत्रण देत आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
आणखी वाचा