मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे सध्या राजकीय नेते एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करताना दिसतायत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत हेदेखील बोचरी टीका करून विरोधकांना नामोहरम करत आहेत. त्यांनी आपल्या एका भाषणात भाजपाचे नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तुलना औरंगजेबाशी केली आहे. या टीकेनंतर आता भाजपा तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. संजय राऊतांच्या या टीकेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाष्य केलंय. मोदींची औरंगजेबाशी तुलना म्हणजे देशद्रोह आहे, असे शिंदे म्हणालेत. ते आज (21 मार्च) मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या (Loksabha Election) जागावाटपावरही भाष्य केलंय.


एकनाथ शिंदे काय म्हणाले?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. देशभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला एक दिशा दिली. त्यांनी 370 हे कलम हटवलं. हे कलम हटवले जावे अशी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची इच्छा होती. मात्र मोदी यांना औरंगजेब म्हणणं देशद्रोह आहे. औरंगजेब कोण होता हे सर्वांनाच माहिती आहे. त्याने भाऊ, वडील अशा कोणालाच सोडलं नव्हतं. त्यामुळे मोदींची औरंगजेबाशी तुलना करणं चुकीचं आहे. याचं उत्तर जनता निवडणुकीतून देईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


45 पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी रणनीती ठरवली


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी बैठक झाली. बैठकीबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रात महायुतीला 45 पेक्षा अधिक जागा जिंकता याव्यात यासाठी प्रयत्न चालू आहेत. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी कशाप्रकारे काम केलं पाहिजे याबाबत चर्चा झाली. या बैठकीला सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. सर्व जागा कशा जिंकता येतील, यासाठी रणनीती ठरवण्यात आली, अशी माहिती शिंदे यांनी दिली.


संजय राऊत काय म्हणाले होते?


आपल्या एका भाषणात संजय राऊतांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती. औरंगजेबाचा जन्म हा नरेंद्र मोदी यांच्या गावाजवळ झालेला आहे. त्यामुळे दोघांचीही विचारसरणी सारखीच आहे, असे राऊत म्हणाल होते.