मुंबई: मंत्री माणिकराव कोकाटे यांनी साडेसाती पासून मुक्ती मिळावी व विरोधकांच्या आरोपांपासून सुटका व्हावी म्हणून साडेसाती मुक्ती स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिमांडळ येथील शनि महाराज मंदिरात अभिषेक आणि पूजा अर्चा करून विरोधकांवर विजय मिळावा अशी प्रार्थना केली आहे. लवकरच कोकाटेंच्या राजीनाम्याबाबतचं चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज माणिकराव कोकाटेंनी गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेली विरोधकांच्या आरोपांच्या साडेसातीपासून मुक्ती मिळावी म्हणून मंत्री कोकाटे यांनी दर्शन घेतले. शनी मंदिरात जाऊन शनि देवाची विधिवत पूजा करत विरोधकांच्या साडेसातीतून मुक्ती मिळावी म्हणून या साडेसाती मुक्ती ठिकाणाला दिली आहेत. शनिवारी शनि देवाची साडेसाती मुक्ती ठिकाणी पूजा केल्याने मागे लागलेली इडा पिडा दूर होत असल्याची भाविकांची भावना आहे. यावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी हल्लाबोल केला आहे.
शनिमहाराज कधीही सांगत नाहीत, तरीही चुका करून
रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती पोस्ट केली आहे. यावेळी रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंच्या शनिमंदिरात केलेल्या पुजेवरून सुनावलं आहे, रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, '‘तुम्ही चुका करा मी तुमच्या पाठीशी आहे’, असं शनिमहाराज कधीही सांगत नाहीत, तरीही चुका करून अडचणीत सापडल्यानंतरच भल्याभल्यांना शिंगणापूरच्या शनिदेवाची आठवण येते…स्वार्थासाठी कोणत्याही मंत्र्याने शनिदेवाला कितीही तेलाचा अभिषेक केला तरी राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या कृषि विभागाला आणि मागासवर्गीय समाजाच्या समाजकल्याण विभागाला लागलेली पिडा आणि ती लावणारे या दोघांनाही दूर कर, अशी मी शनिमहाराजांना प्रार्थना करतो!'.
सामाजिक न्याय मंत्र्यांना घरी जाण्याचे तर संकेत...
त्याचबरोबर रोहित पवारांनी भाजप नेत्या आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि शिवसेना नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यातीव वादावर देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, यावर पोस्ट करत ते म्हणाले, 'कॅबिनेट मंत्र्यांना डावलून राज्यमंत्री परस्पर बैठका घेत असतील तर हे नक्कीच योग्य नाही. समाजकल्याण खात्यात हे सुरु असून कॅबिनेट मंत्री संजय शिरसाठ साहेबांना डावलून राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ या बैठका घेत आहेत, याचा अर्थ काय घ्यायचा? सामाजिक न्याय मंत्र्यांना घरी जाण्याचे तर संकेत यातून दिले जात नाहीत ना? तसं असेल तर सद्यस्थिती बघता अपवाद म्हणून याचं स्वागतच करायला हवं!', असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.
माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी
नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ येथील शनी मंदिर देशातील एकमेव साडेसाती मुक्तपीठ म्हणून म्हणून ओळख आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या जीवनाची राजकीय सुरुवात याच मंदिराच्या दर्शनापासून केले आहे. शनी देव हा राजकीय क्षेत्राचा गुरु असल्याने त्यामुळे अनेक राजकीय नेते या ठिकाणी येऊन गेले आहेत. संकटात सापडलेल्या राजकीय नेत्यांना या ठिकाणाहून ऊर्जा मिळत असते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी ही आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात या शनिश्वराच्या दर्शनाने केली होती, त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी या ठिकाणी भेट ही दिल्याच पुजाऱ्यांनी सांगितले आहे. संकटात सापडल्यानंतर आणि चारही बाजूंनी टीका होत असताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनि देवाच्या चरणी नतमस्तक होऊन विरोधकांच्या साडेसातीतून आपल्याला मुक्ती मिळावी अशी प्रार्थना केली आहे. एकूणच वादग्रस्त विधानानंतर कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात न दिसणारे माणिकराव कोकाटे आज नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ या ठिकाणी शनी मंदिरात आल्याने अनेक चर्चांना उधाण आले.