Rohini Khadse on Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे स्वत:च शेतकऱ्यांना लागलेली 'साडेसाती'; कृषीमंत्र्यांच्या शनिमंदिरातील पूजेवर रोहिणी खडसेंची बोचरी टीका
Rohini Khadse on Manikrao Kokate : नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील प्रसिद्ध शनिमंदिरात माणिकराव कोकाटे यांनी पूजाअर्चा केली.

Rohini Khadse on Manikrao Kokate : विधानसभेत ऑनलाइन रमी खेळताना आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीकेचा भडिमार सहन करत असलेले कृषीमंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शनिमंदिरात जाऊन पूजा केली. नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील प्रसिद्ध शनिमंदिरात (Shani Temple) कोकाटे यांनी पूजा आणि आरती केली. हे मंदिर साडेसातीपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. अनेक राजकीय नेते येथे नियमित दर्शनासाठी येत असतात. पूजेनंतर बोलताना कोकाटे यांनी "आपल्या सर्वांच्या आयुष्यातली साडेसाती नष्ट होवो," अशी प्रार्थना मी शनिदेवाच्या चरणी केले असल्याचे म्हटले आहे. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर खोचक टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, विरोधकांच्या आरोपाच्या साडेसातीतून सुटका व्हावी म्हणून मंत्री मणिक कोकाटे यांनी शनी देवाची पूजा केली आहे, त्यांना साकडे घातले आहे अशी बातमी वाचली. खरंतर मंत्री कोकाटे खुद्द शेतकऱ्यांच्या मागे लागलेली 'साडेसाती' आहेत. या साडेसातीपासून शेतकऱ्यांची सुटका झाली तर शनी देवाच्या दर्शनाला जाईल, असे म्हणत त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर हल्लाबोल केलाय.
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शेतकरी आणि विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात शुक्रवारी पुण्यात रात्री दोन तास चर्चा झाली. सभागृहातील माणिकराव कोकाटे यांचे कृत्य त्यानंतर पत्रकार परिषदेत सरकारला भिकारी म्हणाले. या वक्तव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची माहिती आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारला सातत्याने अडचणीत आणत असल्याने आता राजीनामा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आज संध्याकाळपर्यंत कोकाटे यांच्या बाबतचा निर्णय अजित पवार पक्षातील आपल्या नेत्यांजवळ जाहीर करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
आणखी वाचा
शक्तीप्रदर्शन करायची गरज नाही, अजित पवारांवर माझा विश्वास; माणिकराव कोकाटेंनी समर्थकांना शांत केलं

























