Jalgaon: राज्यात सध्या एकनाथ खडसे भाजपमध्ये की राष्ट्रवादीत याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. गेले काही दिवसांपासून खडसे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील अशा चर्चा सुरू असून खडसेंच्या राजीनामेबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) अनभिज्ञ असल्याचं त्या म्हणाल्यात. दुसरीकडे भाजपने ते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह खडसेंची सून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (raksha Khadse) यांनीही हे एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशावर बोलणं टाळलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत संभ्रम कायम आहे. 


लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन एकनाथ खडसे भाजप पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आता लोकसभा निवडणूक उलटून विधानसभा निवडणूक जवळ आली तरी खडसेंच्या पक्षप्रवेशाचा संभ्रम कायम असल्याचा दिसून येत आहे. एकीकडे 25 ऑगस्ट ला पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून पंतप्रधानांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशी जोरदार चर्चा रंगली आहे. 


खासदार सुप्रिया सुळे खडसेंच्या राजीनाम्याबद्दल अनभिज्ञ 


एकनाथ खडसे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात आहेत का असा प्रश्न त्यांना विचारला असता मला याबाबत माहिती नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी माहिती काढून तुम्हाला सांगते असं त्या म्हणाल्या. खडसेंनी राजीनामा दिला का? पक्षप्रवेश करणार का हे मला विचारण्यापेक्षा खडसेंना विचारलं तर लवकर उत्तर मिळू शकेल असे त्या म्हणाल्या. ते जर राजीनामा दिला असं म्हणत असतील तर आमच्या रेकॉर्डला ते असेल असंही त्यांनी सांगितलं.


गिरीश महाजन खडसेंच्या भाजप प्रवेशावर साशंक 


एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे कोणालाच माहीत नाही असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना टोला लगावला होता. भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार का हे तुम्हीच त्यांना विचारा असं म्हणत त्यांनी विषय टाळला. खडसेंची डायरेक्ट वरती लाईन आहे असा टोला लगावत, त्यांनी राजीनामा दिला आहे का किंवा ते भाजपमध्ये येणार आहेत का हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा असं महाजन म्हणाले. सुप्रिया सुळे यांना माहित नाही, जयंत पाटलांना माहित नाही, शरद पवारांनाही माहित नाही. त्यापेक्षा त्यांनाच जाऊन विचारा त्यांचं स्टेटस नक्की काय... असं म्हणत गिरीश महाजनांनी भाजप पक्षप्रवेशाबाबत साशंकता व्यक्त केली.


पंतप्रधानांच्या उपस्थितीत खडसेंचा भाजप प्रवेश? 


एकीकडे 25 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतच एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का अशा जोरदार चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत आपली कन्या रोहिणी खडसे यांच्या उमेदवारीसाठी एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष प्रवेश लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे. त्यामुळे 25 ऑगस्ट रोजी खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार का ? हा गोंधळ संपणार की कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.