Girish Mahajan :  देशद्रोहाच्या आरोपावरून सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची एसआयटी चौकशी (SIT Probe) केली जात आहे, त्याचप्रमाणे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची देखील एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते  एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे. सलीम कुट्टा प्रकरणात (Salim Kutta) भाजपकडून शिवसेना ठाकरे गटावर टीका केली जात असताना आता खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे सलीम कुट्टा प्रकरणात राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे म्हटले जात आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी महाजनांवर टीका केली. त्यांनी म्हटले की, तथ्य नसताना सुद्धा माझ्यावर दाऊदच्या बायकोसोबत संभाषण झाल्याचा आक्षेप हा घेण्यात आला होता. त्यानंतर  माझी चौकशी करण्यात आली होती. आता फोटोच्या माध्यमातून गिरीश महाजन यांचा सलीम कुट्टा याच्याशी संबंध दिसत आहे. देशद्रोहींशी गिरीश महाजन यांचे सरळ संबंध आहे का असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला आहे. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. 


महाजनांचा राजीनामा घ्या... 


माझ्यावर त्यावेळी आरोप झाले त्यावेळी पक्षाने माझा राजीनामा घेतला होता. आता गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोहाचे आरोप होत आहेत व ते पुराव्यानिशी समोर देखील येत आहे त्यामुळे मंत्रिमंडळात असताना गिरीश महाजन यांची चौकशी कशी होऊ शकेल? असा प्रश्न देखील एकनाथ खडसेंनी उपस्थित करत गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खडसे यांनी केली. मात्र, आता भाजपच्या भूमिकेप्रमाणे गिरीश महाजन ही भाजपच्या वॉशिंग मशीन मधून स्वच्छ होऊन बाहेर येतात की काय अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली. 


फडणवीसांवर ही टीका


शरद पवार यांनी काय केलं त्यापेक्षा तुम्ही आता काय करता याला जास्त महत्त्व असून मराठ्यांना आरक्षण फक्त आम्ही देऊ शकतो अशी राहणार भीमदेवी गर्जना तुम्ही केली होती त्यामुळे टोलवाटोलवी करण्यापेक्षा तुम्ही काय दिवे लावत आहात हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे असा टोला एकनाथ खडसेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. 


दरम्यान, मुदतीत आरक्षणाबाबत निर्णय झाल्यास गिरीश महाजन यांनी आपल्या सोबत केलेल्या चर्चेचे रेकॉर्डिंग व्हायरल करणार असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. त्यामुळे मनोज जिरांगे पाटील यांनी अधिक वेळ न घालवता नेमका मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन गिरीश महाजन यांनी तुमच्याशी काय बोलणं केलं हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे असंही एकनाथ खडसे म्हणाले.