Maharashtra Politics : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत आज अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. मात्र, त्यांच्या याच पक्षप्रवेशावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'ज्यांना डिमोशनचे बक्षिस मिळाले, तेच चव्हाणांना प्रवेश देणार' असल्याचे म्हणत दानवे यांनी फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. 


याबाबत ट्वीट करत दानवे म्हणाले की, “आज अशोक चव्हाण औपचारीकपणे भाजपवासी होणार, अश्या बातम्या आहेत. खरं तर ते एका उंचीचे लोकनेते आहेत. त्यांचा प्रवेश देश पातळीवरील एखाद्या नेत्याने करून घेणे अपेक्षित होते, ज्याला चव्हाणांच्या बरोबरीचा जनाधार आहे. पण ज्यांना 'डिमोशन'चे बक्षिस मिळाले, तेच चव्हाणांना प्रवेश देणार आहेत म्हणे. सोबत आमदारकीसाठी हातपाय आपटणारे एक बारावे खेळाडू असणार आहेत म्हणे.. 




अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार? 


माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज दुपारी 12.30 वाजता भाजपमध्ये पक्ष प्रवेश होत असून, भाजप प्रदेश कार्यालय पक्ष प्रवेशाची तयारी केली जात आहे. अशोक चव्हाण आणि माजी आमदार अमर राजूरकर हे दोघेही यावेळी भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांना राज्यसभेची भाजपकडून उमेदवारी देखील दिली जाण्याची शक्यता आहे. तर, अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होताच दिल्लीतून आजच राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावरून आज दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी घडण्याच्या शक्यता आहे. 


काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न 


अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तसेच, त्यांच्या या निर्णयामुळे राज्य प्रदेश काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीवर अशोक चव्हाण यांचा वरचष्मा पाहायला मिळायचा, पण त्यांनी काँग्रेसचा हात सोडल्याने पक्षात भूकंप आला आहे. अशात आता काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक पदाधिकारी देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ काँग्रेस नेत्यांचे प्रदेश काँग्रेस कमिटीतील सदस्यांची मनधरणीचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी काँग्रेस वरिष्ठ नेत्यांकडून जिल्हाध्यक्षांना देखील फोनाफोनी केली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


आधी म्हणाले अमित शाहांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, पण प्लॅन अचानक बदलला; अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची इतकी घाई का?