बीड : लोकसभा निवडणुकांपूर्वी प्रचारावेळी बीड (Beed) जिल्ह्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. बीडमध्ये मराठा आणि ओबीसी वाद ऐन निवडणुकीत उफाळून आला. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण मागणीचे केंद्रस्थान असल्याने बीडमध्ये मराठा (Maratha) समाज एकटवला होता. त्यातच, शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडून बजरं सोनवणेंना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे, भाजपच्या पंकजा मुंडेंविरुद्ध बजरंग सोनवणे असा सामना रंगला. त्यातच, मराठा विरुद्ध ओबीसी असे जातीय वळण या निवडणूक लढाईला मिळाल्याने बीडमध्ये मतदानादिवशीही अनेक घटना घडल्या. त्यावरुन, आता मतमोजणीपूर्वीच वाद होत आहे. बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाकडे (Election commission) वेगळीच मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यात या लोकसभा निवडणुकीमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं आहे. यंदा येथील मतदानाची टक्केवारीही वाढल्याचं पाहायला मिळालं. केवळ मराठवाडाच नाही तर राज्यभरात पहिल्या 5 सर्वाधिक मतदारसंघात बीडचा समावेश आहे. बीडमध्ये 70.92 इतके मतदान झाले आहे. मात्र, बीडमध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मतदान झाल्यानंतर एकानंतर एक व्हिडीओ बाहेर काढले आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने सुद्धा बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे खुलासा मागितला. बीडच्या जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कुठेही बोगस मतदान झाले नसल्याचे सांगितले असले तरी निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तक्रारीनंतर काही ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत. त्यातच, आता मतमोजणीच्या अनुषंगाने बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाकडे महत्त्वाची मागणी केली आहे.
बीड लोकसभा निवडणुकीमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप केल्यानंतर आता सोनवणे यांनी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे आणि पोलिस निरीक्षक दहिफळे यांना मतमोजणी प्रक्रियेमध्ये सहभाग देऊ नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. बीडचे हे सगळे अधिकारी बीड जिल्ह्यातीलच रहिवाशी असून त्यांचा मतमोजणी प्रक्रियेवर मोठा परिणाम होऊ शकतो, असा आक्षेपच बजरंग सोनवणे यांनी घेतला आहे. यापूर्वी आम्ही बीडच्या महसूल प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडे काही मागण्या केल्या होत्या, पण त्या मागण्या अद्यापही पूर्ण केल्या नाहीत. त्यावरुनच, बीड जिल्ह्यात बोगस मतदान झाल्याचा आरोप देखील सोनवणे यांनी केला आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील प्रशासन हे पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या दबावाला बळी पडत असल्याने आता निवडणूक आयोगानेच आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी देखील बजरंग सोनवणे यांनी आयोगाकडे पत्रातून केली आहे.
हेही वाचा
Beed : बीडमध्ये चाललंय काय? बोगस मतदानाचे व्हिडीओ बाहेर, फेरमतदान घेण्याची शरद पवार गटाकडून मागणी