धाराशिव : उस्मानाबाद (Osmanabad) 40 लोकसभा मतदारसंघ नाव असलं तरी धाराशिव (Dharashiv) असं जिल्ह्याचं नामकरण झाल्याने धाराशिव लोकसभा असाच प्रचार सर्व राजकीय पक्षांनी धाराशिव जिल्ह्यात केला. धाराशिव मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, उमरगा, परंडा हे चार विधानसभा मतदारसंघ, तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लातूर जिल्ह्यातील औसा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. 


धाराशिवमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान


18 व्या लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान संपन्न झालं. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान घेण्यात आलं होत. 19 एप्रिल 2024 रोजी अद्ययावत करण्यात आलेल्या मतदार यादीतील मतदार संख्येनुसार या निवडणुकीत 19 लक्ष 92 हजार 737 मतदाराची संख्या आहे. यामध्ये 10 लक्ष 52 हजार 96 स्त्री, 9 लक्ष 40 हजार 560 पुरुष आणि 81 तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता. 


अर्चना पाटील आणि ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात अटीतटीची लढत


उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. वंचितचे भाऊसाहेब आंधळकर यांच्यामुळे त्यात आणखीन रंगत वाढली. प्रमुख प्रतिस्पर्धी वगळता नोटासह मतदान यंत्रावर मतदारांसमोर एकूण 30 पर्याय शिल्लक होते. या दुरंगी लढतीत प्रमुख प्रतिस्पर्धी वगळता उर्वरित 30 पर्यायांमध्ये किती मतांची विभागणी होणार, यावरही जय-पराजयाचे समीकरण अवलंबून राहणार आहे. खासदार ओमराजे राजेनिंबाळकर यांनी त्यांच्या मूळ गावी गोवर्धनवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. तर महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी तालुक्यातील तेर या त्यांच्या मूळ गावी पती आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि मुलांसह मतदान केलं.


उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया मंगळवारी शांततेत पार पडली. धाराशिव शहरातील भीमनगरमधील एक आणि नळदुर्ग येथील दोन मतदान केंद्रांवर मतदान यंत्राचा तांत्रिक बिघाड वगळता जिल्ह्यातील अन्य कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मागील तीन लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदारांने केलेले मतदान पाहता मतदारसंघात अंदाजे 60.88 टक्के मतदान झालं आहे. मागील दोन्ही निवडणुकांच्या तुलनेत वाढलेला मतदानाचा टक्का यंदा कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 4 जूनपर्यंत सगळ्या उमेदवारांचे देव आता पाण्यात राहणार आहेत. 


या नेत्यांकडून प्रचारार्थ भव्य सभा


महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील प्रचारार्थ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिवमध्ये सभा घेतली. अजित पवार यांनी अर्चना पाटील यांचा फॉर्म भरताना मोठे शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादीच्याच उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनीही अर्चना पाटील यांच्यासाठी सभांचा धडाका लावला होता आणि आपल्या परंडा आणि इतर भागातून लीड देण्याचाही विश्वास या निमित्ताने तानाजी सावंत यांनी दिला होता. 


महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमध्ये सभा घेतली तर, शरद पवार यांनी तुळजापूरमध्ये सभा घेऊन ओमराजे निंबाळकर यांनाच निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केलं. भाऊसाहेब आंधळकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी ऍड प्रकाश आंबेडकर यांनी धाराशिवमध्ये भर उन्हात सभा घेतली होती. 


यापूर्वीच्या लोकसभा निवडणूक निकालाचा तपशील



  • 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांना 6 लाख 7 हजार 699 इतकी मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील यांना 3 लाख 73 हजार 374 इतकी मते मिळाली. मोदी लाटेत गायकवाड यांनी विक्रमी दोन लाख 34 हजार 325 मतांनी विजय मिळविला. 

  • 2019 च्या लोकसभेसाठी 18 लाख 86 हजार 238 मतदारापैकी 11 लाख 96 हजार 166 मतदारांनी 2 हजार 127 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसकडून राणा जगजितसिंह पाटील असा सामना रंगला होता. यात ओमराजे निंबाळकरांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा एक लाख 27 हजार 566 मतांनी मतांनी दणदणीत पराभव केला होता. 


ओमराजे निंबाळकर यांचा या लोकसभा निवडणुकीत पराभव करून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पराभवाचा अर्चना पाटील वचपा काढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.


उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 63.88 टक्के मतदान 


2024 च्या लोकसभेसाठी धाराशिवमधून 19 लाख 92 हजार 737 मतदारांपैकी 6 लाख 90 हजार 533 पुरुष मतदारांनी तर 5 लाख 82 हजार 216 स्त्री मतदार तर  20 तृतीयपंथ मतदारांनी एकूण 12 लाख 72 हजार 969 मतदारांच्या मतदानाची नोंद झाली त्याची टक्केवारी 63.88 आहे. 


आत्तापर्यंतचे सर्वाधिक 31 उमेदवार रिंगणात 


उस्मानाबाद लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक 31 उमेदवार या निवडणूक रिंगणात आहे. सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकीत 14 उमेदवार, सन 2014 च्या निवडणूकीत 27 उमेदवार, सन 2009 च्या निवडणूकीत 25 उमेदवार, सन 2004 मध्ये 8 उमेदवार, सन 1999 मध्ये 5 उमेदवार, सन 1998 मध्ये 7 उमेदवार, सन 1996 मध्ये 21 उमेदवार, सन 1991 मध्ये 17 उमेदवार, सन 1989 मध्ये 12 उमेदवार, सन 1984 मध्ये 6 उमेदवार, सन 1980 मध्ये 5 उमेदवार, सन 1977 मध्ये 3 उमेदवार, सन 1971 मध्ये 5 उमेदवार, सन 1967 मध्ये 3 उमेदवार, सन 1962 मध्ये 3 उमेदवार, सन 1957 मध्ये 2 उमेदवार, सन 1951-52 च्या सार्वत्रिक निवडणूकीत 2 उमेदवारांत लढत झाली.


ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील लढत


उस्मानाबाद लोकसभेची ही लढत महायुतीच्या अर्चना राणा जगजीतसिंह पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यात झाली. अर्चना पाटील यांच्यासाठी महायुतीने केलेलं बूथ लेव्हलचे प्लॅनिंग आणि नरेंद्र मोदींची सभा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरणारी ठरली. त्यामुळे अर्चना पाटील या राष्ट्रवादमधून नव्याने लढत असल्या तरी, त्यांचा महिलांचा संपर्क आणि विकासाच्या मुद्द्यावर लढलेली निवडणूक अर्चना पाटील यांना फायद्याची ठरणार असली, तरी ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेतून लोकांना दिलेली भावनिक हाक लोकांपर्यंत चांगलीच पोहचल्याचं चित्र धाराशिवमध्ये दिसलं. 


ओमराजे निंबाळकर यांचा दांडगा जनसंपर्क आणि लोकांशी फोनवरून साधलेला संवाद यामुळे सामान्य मतदार ओमराजेंच्या बाजूला झुकल्याच प्रामुख्याने दिसून आलं. अर्चना पाटील यांच्यासाठी महायुतीचं बुथ लेवलचं काम आणि अर्चना पाटील यांची महिला वर्गात असलेली प्रतिमा आणि नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासाचा मुद्द्याच्या आधारे अर्चना पाटील यांचं पारडे जड असताना, ओमराजे निंबळकरांनी फोन द्वारे साधलेला संपर्क आणि सर्वसामान्य असलेली जवळीकता पाहता ओमराजे निंबाळकर विजयाची पुनरावृत्ती करणार, अशी उस्मानाबाद मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे.