मुंबई: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या सहाय्याकांमार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे मंत्रिपदावरुन पायउतार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सोमवारी संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येचे क्रौर्याची परिसीमा दाखवणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देवगिरी बंगल्यावर अजित पवार, देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची एक बैठक पार पडली होती. जवळपास दोन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना उद्या मंत्रि‍पदाचा राजीनामा द्या, अशी सूचना केली होती. त्यानुसार धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

Continues below advertisement


धनंजय मुंडेंनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


बीड बंदची हाक


संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बीड जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे आज बीड शहरातील दुकाने, कार्यालये बंद आहेत. बीडमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड शहरात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे उर्वरित काळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित राहणार की नाही, हे बघावे लागेल.



आणखी वाचा


मोठी बातमी : धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा सोपवला, दोन सहकाऱ्यांकडून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला!