मुंबई: संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे क्रौर्याची परिसीमा दाखवून देणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी रात्री राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज धनंजय मुंडे हे आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार आहेत. धनंजय मुंडे हे एखाच्या व्यक्तीला राजीनामा घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पाठवतील, असे समजते. साधारण 11 वाजण्याच्या सुमारास धनंजय मुंडे आपला राजीनामा देवेंद्र फडणवीसांकडे सुपूर्द करण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो सोमवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची एक बैठक पार पडली. जवळपास दोन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीअंती देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना 'उद्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या', अशी सूचना केली. त्यानुसार आता धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील आठवडाभरापासून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा, याविषयी खलबतं सुरु होती. देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. मात्र, अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास उशीर झाला, असे सांगितले जात आहे.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाली होती. याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी वाल्मिक कराड याचा सहभाग असल्याची चर्चा होती. नंतर एसआयटी आणि सीआयडीच्या तपासात वाल्मिक कराड या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सीआयडीने न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला लढवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम आणि अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता आरोपपत्र दाखल झाल्यामुळे लवकरच याप्रकरणाच्या सुनावणीला न्यायालयात सुरुवात होईल.
आणखी वाचा
एक डोळा अर्धोन्मिलित, डोळ्यांवर गॉगलची झापडं, मीडियाने प्रश्न विचारताच धनंजय मुंडे अडखळत म्हणाले....
देवेंद्र फडणवीस आग्रही, पण धनंजय मुंडे तयार नव्हते; काल बैठक अन् थेट आदेश, नेमकं काय घडलं?