Dhairyasheel Mohite Patil, सांगोला : गेल्या वर्षभरापासून सांगोल्यातील पोलीस आणि महसूल अधिकारी हे राजकीय दबावापोटी एकतर्फी कामकाज करीत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे येत आहेत. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कामे केल्यास थेट खुर्चीत जाऊन जाब विचारला जाईल. जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये , जर आमचा संयम सुटला तर सोलापूर जिल्ह्यातील जनता काय आहे हे त्यांना कळेल अशा शब्दात माढा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातील अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला.
मोहिते पाटलांचे जेसीबीने फुले उधळत जंगी स्वागत करण्यात आले
सांगोला तालुक्यातील महूद येथे शेकापच्या मेळाव्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आले असता त्यांचे जेसीबीने फुले उधळत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शेकापचे नेते आणि सांगोला विधानसभेसाठी इच्छुक असणारे डॉ बाबासाहेब देशमुख यांची व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची जोरदार मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार रामहरी रुपनवर यांचेसह शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेकापने आज महूद येथे केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे.
पोलीस आणि महसूल अधिकारी एकतर्फी कामे करीत असल्याच्या तक्रारी
सांगोला तालुक्यात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या बाजूने पोलीस आणि महसूल अधिकारी एकतर्फी कामे करीत असल्याच्या तक्रारी यावेळी भाषणात शेकाप कार्यकर्त्यांनी सांगताच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातच बापूंच्या प्रेमातील अधिकाऱ्यांना सज्जड दम भरत राजकीय द्वेषाने कामे केल्यास आमचा संयम सुटेल असा इशारा दिला. यावेळी नको झाडी डोंगर , नको शिमला गुवाहटी आमच्या गणपतराव आबांचे सांगोलाच भारी अशा जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी महुद परिसर दणाणून सोडला होता. महुद येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भव्य आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात महुदकरांनी पारंपारीक वाद्य,हालग्या वाजवत 20 जेसीबीतून पुष्पवृष्टी व फटाक्याच्या आतिषबाजीने आपली ताकद दाखवून दिली . खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या मेळाव्यात सांगोला विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Dhairyasheel Patil : शेकापमधून आलेल्या धैर्यशील पाटलांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी, अजितदादांना एक जागा सोडली