मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत आमच्यासमोर आव्हानच नाही, असे मी म्हणणार नाही. पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये (Loksabha Election 2024) आम्ही जितक्या जागा जिंकल्या आहेत, त्याच्यापेक्षा कमी जागा आम्हाला मिळणार नाहीत. आम्ही गेलो तर पुढेच जाऊ पण आमचा महाराष्ट्रातील लोकसभा जागांचा आकडा खाली येणार नाही, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. ते शुक्रवारी एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बोलत होते. 


यावेळी देवेंद्र फडणवीसांना आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्हाला किती जागा मिळणार, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी म्हटले की, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत आमच्यासमोर आव्हानं नाहीत, असे मी कधीच म्हणणार नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये आम्ही लोकसभेच्या ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. आता आम्हाला त्यापेक्षा पुढे जायचं असेल तर मेहनत ही करावीच लागेल. आम्ही गेलो तर यापेक्षा पुढेच जाऊ, पण आम्ही गेल्या दोनवेळच्या जागांपेक्षा खाली येणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितले.


मी सध्या उपमुख्यमंत्री असलो तरी मला हवा तो अजेंडा चालवू शकतो: फडणवीस


प्रत्येक सरकारची एक काम करण्याची पद्धत असते. पूर्वीच्या सरकारमध्ये मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी माझे अधिकार आणि काम करण्याची क्षमता वेगळी असते. आता मी उपमुख्यमंत्री असलो तरी पूर्वी जो अजेंडा चालवत होतो, तोच चालवू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधीही मी हातात घेतलेल्या कामाला सहकार्य करतात. माझे अधिकार उपमुख्यमंत्र्यांचे आहेत पण मी मला हवे ते काम करु शकतो, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.


...आणि मी मुख्यमंत्र्याचा विरोधी पक्षनेता झालो; फडणवीसांना सांगितला तो किस्सा


देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्याशी झालेल्या राजकीय वाटाघाटींचा प्रसंग पुन्हा एकदा सांगितला. त्यावेळी आम्ही शरद पवार यांच्याशी बोलणी केली होती. त्यांनी युतीसाठी होकार दिला होता. शरद पवार यांनी नंतर अजित पवारांना वाटाघाटीसाठी बोलावले. अजित पवारांसोबत बोलणी फायनल झाली, त्याला शरद पवारांनी मंजुरी दिली. पण सवयीनुसार शरद पवार शेवटच्या क्षणी मागे हटले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मला पुढे करुन तुम्ही सगळं ठरवलं आणि आता ऐनवेळी मागे हटताय, हे अजित पवारांना आवडले नाही. मी भाजपशी विश्वासघात करु शकत नाही, असे त्यांनी शरद पवारांना सांगितले आणि ते आमच्यासोबत आले. राष्ट्रवादीच्या इतर आमदारांनाही आमच्यासोबत यायचे होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ती युती टिकवता आली नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री पदावरुन विरोधी पक्षनेता झालो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.