Radhakrishna Vikhe Patil नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारी करत आहेत. जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीत चर्चा सुरु आहेत. काही जागांचा तिढा सुटला असून काही जागांवर विविध पक्षांकडून दावेदारी सुरु आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद पवार गट आणि भाजपा या पक्षांकडून आधीच दावा करण्यात आला आहे. आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत (Nashik Lok Sabha Constituency) एक मोठे वक्तव्य केले आहे. 


राधाकृष्ण विखे पाटील आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आज तीनही मतदारसंघाचा दौरा करणार आहोत. नाशिक,शिर्डी आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे आहे. नाशिक लोकसभेच्या जागेवर भाजपाने दावा केला आहे. मागणी करण्यासंदर्भात काही गैर नाही. मात्र महायुतीची सत्ता आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. 


मनोहर जोशी बाळासाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचं निधन झालं. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मनोहर जोशी यांच्या नेतृत्वखाली मला कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. कृष्णा खोरे महामंडळाचे स्थापना त्यांनी केली होती. त्यांच्यासोबत अनेक ठिकाणी जाऊन मी काम केले आहे. आज ते आपल्यातून गेले आहेत. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्राच्या राजकारणात ते एक अभ्यासू नेते होते. सगळे मान अपमान त्यांनी सहन केले, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच सुपारी बहाद्दर यांना पक्षात स्थान आहे. म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची अशी अवस्था झाल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 


जरांगेंनी आंदोलनाचा हट्ट सोडावा 


शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, निवडणूक आयोगाचा तो निर्णय   आहे, त्याविषयी मी फार बोलणार नाही. मराठा आरक्षणाबाबत विचारणा केली असता विखे पाटील म्हणाले की, जो डाटा आपण गोळा केला आहे त्यानुसार आपण 10 टक्के आरक्षण दिले आहे.  मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी समजून घेतले पाहिजे. त्यांनी आंदोलन मागे घेतले पाहिजे. आंदोलन करण्याचा हट्ट सोडला पाहिजे. 


बारामती लोकसभेवर काय म्हणाले विखे पाटील? 


बारामती लोकसभेला सुप्रिया सुळे यांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. बारामती जागा ते लढणार आहेत. बघू पुढे काय होतय ते असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Maharashtra Politics : शिंदेंच्या शिवसेनेची होणार अडचण! रामटेक लोकसभेवर भाजप नेत्यांचा डोळा