Devendra Fadnavis on Raj Thackeray : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा एकत्र येणार का, याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी घडलेल्या एका महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीमुळे या चर्चांना नवे वळण मिळाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-शिवसेना युतीला ब्रेक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यासाठी खास पोस्ट केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर राज ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे की, "महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!" या विशेष पोस्टच्या दोन दिवस आधीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. दोन्ही जवळपास दीड तास बंद दाराआड चर्चा झाली होती. या भेटीनंतर भाजप महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करत आहे का? राज ठाकरे त्यांचे भाऊ उद्धव ठाकरे यांच्यासोबत न जाता भाजपसोबत युती करण्याचा विचार करत आहेत का? असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसाच्या आधीच पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगितले होते की, 14 जून रोजी ते त्यांना भेटू शकणार नाहीत, कारण त्या दिवशी ते मुंबईबाहेर असतील. त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली भेट होणं शक्य नाही, कारण या दिवशी मी सहकुटुंब मुंबई बाहेर जात आहे. तुमच्या आणि किंवा इतरांच्या मनात हा प्रश्न येईल की, मी वाढदिवस साजरा का करणार नाहीये? काही विशेष कारण आहे का? पण मनापासून सांगतोय की, असं कोणतंच कारण नाही. त्यामुळे येत्या 14 जूनला तुम्हाला भेटता येणार नाही, याचे कोणतेही अर्थ काढू नका, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा