Air India Plane Crash Ahmedabad: अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये राज्यातील 9 जणांचा समावेश आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे. अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताचा डीजीसीए, एनएसजी, एनआयए, गुजरात एटीएसकडून कारणांचा तपास सुरु करण्यात आला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. 

Continues below advertisement


संजय राऊत नेमकं काय म्हणालेत?


संजय राऊत म्हणाले की, ड्रीमलाइनरच्या अपघाताची चौकशी सुरू आहे. लोकांच्या मनात शंका आहे, त्याची चौकशी देश-विदेशातील एजन्सी करीत आहेत. यूपीएच्या काळात याची खरेदी केली गेली. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांना खुलासा करावा लागत होता. हा अपघात घडला कसा? हा सिव्हिल एव्हिएशनला क्षेत्राला पडलेले कोडे आहे. 30 सेकंदामध्ये हे घडले कसे? एकाच वेळेला दोन इंजिन बंद कसे पडले? कोणी सायबरच्या माध्यमातून हायजॅक केले का? असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. आपण त्यातले एक्सपर्ट नाही. पण शत्रू राष्ट्राकडून आपल्या देशावर जे सायबर हल्ले होत आहेत. ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपली यंत्रणा ठप्प केली जाते. या सगळ्याचा तपास एजन्सी करत असेल तर त्यावर फार चर्चा करणे योग्य नाही. दुर्दैवाने 300 पेक्षा जास्त लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. एक्स्पर्ट वेगवेगळे अँगल्स देत आहेत, त्याचा तपास होईल, असे त्यांनी म्हटले. 


एटीसीमध्ये क्षमतेपेक्षा 56 टक्के माणसे कमी


हा अपघात आहे की घातपात आहे? याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, माझ्या मनात काही शंका आहेत. त्या शंका आता उघडपणे बोलून गोंधळ निर्माण करणे बरोबर नाही. विविध क्षेत्रातून माहिती आमच्याकडे सुद्धा येत असते. मुळात मेंटेनन्स हा विषय आहे. एटीसीमध्ये क्षमतेपेक्षा 56 टक्के माणसे कमी आहेत. ज्यांच्याकडून विमानाच्या सुरक्षेची सगळ्यात जास्त जबाबदारीची आपण अपेक्षा करतो. तिथेच माणसे कमी आहेत. ते का आणि कशासाठी? अहमदाबाद एअरपोर्ट कोणाच्या ताब्यात आहे? अहमदाबाद एअरपोर्टवर विमानांच्या मेंटेनेसची जबाबदारी कोणावर आहे? या सगळ्या गोष्टींवर प्रवाशांच्या मनात संशय आहे. हा संशय असाच राहिला तर विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या घटेल, असेही संजय राऊत म्हणाले. 


....त्याला रील बनवणे म्हणतात


संजय राऊत पुढे म्हणाले की, काल मंत्री त्या मृत्यूच्या ढिगाऱ्यावर उभे राहून ज्या पद्धतीने वागत होते, त्याला रील बनवणे म्हणतात. त्यांच्या कोणाच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश दिसत नव्हता. आम्ही अजूनही अस्वस्थ आहोत की, महाराष्ट्रातील 20 च्या आसपास लोक मरण पावले आहेत. अर्थात तीनशे लोकांचे देखील आम्हाला दुःख आहे. पण सरकारला फार मोठा धक्का बसला किंवा सरकारच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या आहेत. असे या क्षणी तरी दिसत नाही. अहमदाबाद एअरपोर्ट हे केंद्रबिंदू आहे. तिथे सहज कसा कोणाला प्रवेश मिळू शकतो? अहमदाबादच का निवडलं किंवा अहमदाबादला असा अपघात का झाला? असे खूप प्रश्न लोकांच्या मनात आहेत. मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर विमान कोसळले, तिथे 100 च्या आसपास डॉक्टर आणि विद्यार्थी मरण पावले. त्या इमारतीच्या आसपास काही लहान दुकानदार होते. ती मुलं मरण पावली, हे सहज विसरता येणार नाही. पहलगाममध्ये ज्या पद्धतीने हल्ला झाला त्याच पद्धतीचा हा अपघात आहे. हा अपघात आहे, पण माणसं भारताची मेली आहेत. त्यातून सरकार काय धडा घेणार? हवाई क्षेत्रात तुम्हाला सर्वात जास्त सतर्क असायला पाहिजे. एअर इंडियाचे खाजगीकरण करून आपल्याला जबाबदारी झटकता येणार नाही. रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाला एअर इंडिया संदर्भात गांभीर्य आहे की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. विमानांची दुरुस्ती, विमानांची सेवा अशा अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, असेही त्यांनी म्हटले.