Devendra Fadnavis on Thackeray Brothers: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आतापर्यंत कितीवेळा मुंबईबाहेर गेले आहेत. त्यांचा जीव फक्त मुंबईतच अडकला आहे. त्यांना मुंबई महानगरपालिका (BMC Election 2026) काबीज करुन भ्रष्टाचार करायचा आहे, अशी घणघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. ते बुधवारी 'एबीपी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. भाजपचे (BJP) उमेदवार बिनविरोध निवडून आल्यावर टीका केली जाते. मात्र, उद्धव ठाकरे स्वत: विधानपरिषदेत बिनविरोध निवडून आले आहेत. तेव्हा लोकशाही कुठे गेली होती, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ठाकरे बंधूंकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या मराठीच्या मुद्द्याबाबतही भाष्य केले. जर ते मराठी असतील, तर मी काय उत्तर प्रदेशातून आलो आहे का? विधानसभा निवडणुकीत भाजप हा मुंबईत 15 ते 16 जागा जिंकणारा पक्ष आहे. आम्हाला मराठी लोकांची साथ नसती तर आम्ही या जागा जिंकू शकलो असतो का? मी नागपूरमधून आलो आहे, मी काही पाकिस्तानमधून आलेलो नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. राज आणि उद्धव ठाकरे यांना उत्तर भारतीयांबद्दल इतका आकस का आहे? सगळ्या हिंदूंनी एकत्र राहिले पाहिजे. मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र लढायला तयार आहोत. पण अन्य राज्यांमधील लोकांना मारहाण करण्याचे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असा कठोर इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
वारिस पठाण यांनी बुरखेवाली महापौर होईल, असे म्हटले तेव्हा ठाकरे बंधूंच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. हे सगळे व्होटबँकेचे राजकारण आहे. सगळेजण एकत्र मिळून हे करत आहेत. कृपाशंकर सिंह यांनी मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर होईल, असे वक्तव्य केले तेव्हा ठाकरे गट लगेच तुटून पडला. पण 'बुरखेवाली महापौर' या विषयावर ठाकरे गट काहीच बोलला नाही. आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे. पुढील पाच वर्षांमध्ये मुंबईतील विकासकामांसाठी 17 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
महाराष्ट्रात आणि मुंबईत फक्त एकच ब्रँड आहे, तो म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही ब्रँड नाही, बाळासाहेबांचा ब्रँड एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. महानगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते. प्रत्येक निवडणुकीत एक पिढी तयार होते. मात्र, या निवडणुकीत दोन पिढ्या एकत्र रिंगणात उतरल्या आहेत. या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर बंडखोरी झाली असली तरी बंडखोर शांत झाले आहेत, फडणवीस यांनी सांगितले.
तसेच मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा काहीही फायदा होणार नाही, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत केला. आम्ही यंदाच्या निवडणुकीत एकाच घरातील लोकांना उमेदवारी दिलेली नाही. आम्ही मुंबईच्या निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यापैकी कोणालाही प्रचारासाठी आणलेले नाही. आम्हाला महानगरपालिका निवडणुकीत कोणालाही आणायची गरज नाही. पंतप्रधान मोदी यांचं फक्त नाव पुरेसं आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आणखी वाचा