Uddhav Thackeray Raj Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) ही मुलाखत 8 आणि 9 जानेवारीला प्रकाशित होणार आहे. त्याआधी ठाकरे बंधूंच्या या मुलाखतीचा पहिला टीझर संजय राऊत यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे, सत्तेवर असता कामा नये, असं उद्धव ठाकरे बोलताना दिसत आहे. तर मुंबईतील समस्या समजण्यासाठी मुंबईत जन्माला आल्याशिवाय कळणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
संजय राऊतांनी शेअर केलेल्या ठाकरे बंधूंच्या स्फोटक मुलाखतीच्या टीझरमध्ये (Uddhav Thackeray Raj Thackeray Interview) ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी महाराष्ट्राला 20 वर्षे वाट का पाहावी लागली, असं संजय राऊत प्रश्न विचारताना दिसत आहे. तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी या सगळ्यांचे खटाटोप सुरु आहेत, असा दावा राज ठाकरे करताना दिसत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करुच नये, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे.
महेश मांजरेकरांच्या 2 विधानाने वेधलं लक्ष- (Uddhav Thackeray-Raj Thackeray)
साताऱ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ड्रग्ज सापडल्याचे सांगितले. तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी देखील मुलाखतीमध्ये लक्ष वेधले. मुंबईतील वाहतूक समस्या आणि इतर प्रश्न महेश मांजरेकरांनी उपस्थित केले. मी खरं सांगतो, मुंबईकर म्हणून मला आता घराबाहेर पडताना लाज वाटते, असं महेश मांजरेकर म्हणाले. तसेच 10 मिनिटांच्या अंतरासाठी आता 1 तास लागत असल्याचं देखील महेश मांजरेकरांनी सांगितले. यावर मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला, मात्र पुण्यात असं होणार नाही. पुणे लवकरात लवकर बरबाद होईल, असा सावध इशारा राज ठाकरेंनी दिला. तसेच ज्या ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून आले, त्याठिकाणी लोकं बोटावर शाई कशी दाखवणार, असा सवाल महेश मांजरेकर उपस्थित करतात. यावर वाटलेल्या नोटांमुळे हे सर्व घडलं, अशी टीका ठाकरे बंधू करताना टीझरमध्ये दिसून येत आहे.
ठाकरे बंधूची एक्सपायरी डेट जवळ आली- निलेश राणे (BMC Election 2026)
ठाकरे ब्रँड फक्त बाळासाहेब ठाकरेचं, बाकी हे कोणी नाही. हे संपलेत, कार्यकर्ता यांच्या मागे नाही, उमेदवार मिळत नाही. संतापलेले पदाधिकारी यांना शिव्या घालून शाखा बंद करत आहेत. बोलायला लागलो तर कपडे राहणार नाहीत. प्रचाराच्या शेवटच्या टप्यात यांनी पालिकेत कसे कसे किती आणि कुठे कुठे पैसे खाल्ले आहेत ना सर्व काढणार, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी दिला. संजय राऊत कधी लोकांमधून निवडून आलेत का? ते ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेवर बोलतात यांनी केलेलं एक सामजिक काम दाखवावं आणि मग श्रेयासाठी पुढे यावं. या ठाकरे बंधूची एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे. ते या पालिका निवडणुकीत पहायला मिळेल. ज्या मराठी माणसाला यांनी देशोधडीला लावलं, मुंबईतून हद्दपार केलं तो मराठी माणून कधीच यांच्या मागे उभा राहणार नाही, असंही निलेश राणे म्हणाले.
