Devendra Fadnavis On Raj Thackeray And Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा समाचार घेतला. ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध, मात्र इंग्रजीला पायघड्या, असा हल्लाबोल देखील देवेंद्र फडणवीसांनी केला.
पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे जीआर मागे घेतल्यानंतर, ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. तसंच सरकारच्या समितीला न जुमानण्याची भाषा दोन्ही ठाकरेंनी केली. मात्र कुणाच्याही दबावाला बळी न पडता सरकारी समिती जो निर्णय देईल तो घेणारच अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली आहे. रवींद्र चव्हाणांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंवर जोरदार घणाघात केला. त्रिभाषा सूत्राचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच घेतला गेला, याचा देवेंद्र फडणवीसांनी पुनरूच्चार केला.
मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आयोजनाची पाहणी करणार-
पाच जुलैच्या विजयी जल्लोष मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांकडून वरळी NSCI डोम येथे पाहणी केली जाणार आहे. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्याकडून संयुक्त पद्धतीने विजयी जल्लोष मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आयोजनाची पाहणी करणार आहेत.
हिंदीविरोधाचा धाग्यानं ठाकरे बंधूंना आणलं एकत्र-
सध्या महाराष्ट्राचं खासकरून मुंबईकरांचं लक्ष लागलंय ते म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार का? हिंदीविरोधाचा धाग्यानं ठाकरे बंधूंना एकत्र आणलं. 5 तारखेच्या मेळाव्यात या एकीचा आवाज महाराष्ट्रात घुमणार आहे. त्यानंतरही या बंधूंच्या एकीची वज्रमूठ टिकणार का, हा प्रश्न विचारला जातोय. 5 तारखेला ठाकरे बंधू एकत्र दिसणार असले तरी 2006 मध्ये ताटातूट झाल्यापासून ते अनेकदा एकत्र आलेत. पण मनोमिलन मात्र झालं नाही.