छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही असलेले मराठा समाजाचे नेते विनोद पाटील यांच्या गाठीभेटींच्या सत्राला वेग आला आहे. विनोद पाटील (Vinod Patil) यांनी सोमवारी रात्री उशीरा शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीत उदय सामंत (Uday Samant) यांनी विनोद पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची विनंती केली. मात्र, विनोद पाटील यांनी आपण निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले.


विनोद पाटील यांनी सोमवारी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधून आपणच योग्य उमेदवार असल्याचे फडणवीसांना पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. या भेटीमुळे शिंदे गटातील धाकधूक वाढली होती. त्यामुळे शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी सोमवारी घाईघाईत जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर उदय सामंत हे सोमवारी रात्री विनोद पाटील यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. परंतु, सामंत हे विनोद पाटील यांची समजूत काढण्यात अपयशी ठरले. त्यांनी ही सगळी चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली आहे.


विनोद पाटलांकडून सर्व्हेचा आग्रह


विनोद पाटील यांनी उदय सामंत यांच्याशी भेट झाली त्यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वेक्षण करण्याचा आग्रह धरला. या सर्वेक्षणात माझ्या बाजूने निकाल नसेल तर मला तिकीट देऊ नका. अजूनही वेळ गेलेली नाही, छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार बदला, असे विनोद पाटील यांनी उदय सामंत यांना सांगितले. उदय सामंतांनी ही सगळी चर्चा एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली. एकनाथ शिंदे हे मंगळवारी बुलढाण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते विनोद पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. 


विनोद पाटील हे निवडणूक लढण्यावर ठाम राहिल्यास छत्रपती संभाजीनगरमध्ये संदिपान भुमरे यांच्या अडचणी वाढू शकतात. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर विनोद पाटील हे सर्व्हेची भाषा बोलत आहेत. ही शिंदे गटासाठी चिंताजनक गोष्ट आहे. अगोदरच भाजपने नकारात्मक सर्व्हेचे कारण पुढे करत शिंदे गटाला अनेक मतदारसंघातील उमेदवार बदलायला लावले आहेत. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा उमेदवार बदलला जाणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


फडणवीसांच्या भेटीनंतर विनोद पाटील काय म्हणाले?


विनोद पाटील हे कोणत्याही परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत. मला छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची उमेदवारी मिळावी, ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची तीव्र इच्छा होती. पण छत्रपती संभाजीनगरमधील दोन आमदार आणि एका राज्यसभा खासदाराने माझ्या उमेदवारीला विरोध केला. या मतदारसंघातून मी योग्य उमेदवार आहे कारण माझं वय हा एक घटक आहे. तसेच मला छत्रपती संभाजीनगरमधील लोकांच्या समस्या आणि प्रश्न माहिती आहेत. मला संभाजीनगरचे प्रश्न कळले असून त्या संदर्भातील व्हिजन माझ्याकडे आहे. फक्त मराठा नेतृत्व म्हणून नाही तर मी अठरापगड जातींचा उमेदवार म्हणून संभाजीनगरमधून उमेदवारी मागत आहे, असे विनोद पाटील यांनी म्हटले होते.


आणखी वाचा


ठाण्यात मध्यरात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदेंची गोडसे अन् बोरस्तेंशी गुप्त खलबतं, नाशिकचा तिढा आज सुटण्याची शक्यता