मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करुन ते स्वत: दिल्लीत जाणार असल्याचे मला सांगितले होते, असे वक्तव्य अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर स्वत: आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी या विषयावर भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvais) यांनी तुम्हाला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. यावर तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता.  त्यावर आदित्य ठाकरे यांनी फार स्पष्टपणे बोलण्याचे टाळत भाजपने शिवसेनेशी कशाप्रकारे राजकीय करार केला होता, हे सांगण्यावर अधिक भर दिला. 


आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मुख्यमंत्रीपदासाठी माझं ग्रुमिंग करण्याच्या विषयावर उद्धव ठाकरे बोलले आहेत. मुद्दा हा आहे की, 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेत राजकीय करार झाला होता. मात्र, भाजपने त्या कराराचा सन्मान केला नाही. 2014 मध्येही भाजपने (BJP) ऑक्टोबर महिन्यात शिवसनेसोबतची युती तोडली. कारण अंतर्गत सर्वेक्षणात त्यांना स्वबळावर विजय मिळेल, असा अहवाल आला होता. त्यांना 25 वर्षांपासून असलेली युती तेव्हाच तोडायची होती. यावरुन भाजपचे 'वापरा आणि फेका' हे धोरण दिसून येते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. मुख्यमंत्रीपदाबाबत बोलायचं झालं तर आमच्यासाठी शिवसैनिक मुख्यमंत्री होणे जास्त महत्त्वाचे आहे.


फडणवीस म्हणाले होते, आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी ग्रूम करतो, मी दिल्लीला जातो, उद्धव ठाकरेंचा दावा


एकनाथ शिंदेंनी तुमची साथ का सोडली?


एकनाथ शिंदेंनी गुजरातला जे पलायन केले, ते फक्त तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी होते. भाजपच्या 'जॉईन ऑर जेल' या धोरणामुळेच एकनाथ शिंदेंनी आमची साथ सोडली. त्यांच्या गटातील प्रत्येक आमदार तुरुंगवारी टाळण्यासाठीच भाजपसोबत गेला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. राज्यात मविआ सरकार (MVA) पुन्हा सत्तेत आल्यानंतर आम्ही सध्या काळात देण्यात आलेल्या पालिकेच्या सर्व कंत्राटांची चौकशी करु. आम्ही भ्रष्टाचाराचे जे-जे आरोप केलेत, त्याबाबत आमच्याकडे पुरावे आहेत. आम्ही कोणालाही सोडणार नाही, अगदी महापालिकेच्या आयुक्तांनाही नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.


आणखी वाचा


उद्धव ठाकरे भ्रमिष्ट, त्यांना वेड लागलंय, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका