Allocation of Portfolios : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी (Maharashtra Cabinet Expansion) तब्बल 39 दिवस वाट बघावी लागली आणि आता दोन दिवस झाले तरी खाते वाटप होत नाही. त्यामुळे खाते वाटप कधी होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. मलाईदार खात्यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक (Cabinet Meeting) पार पडली परंतु सर्वच मंत्री हे बिन खात्याचे मंत्री म्हणून बैठकीला उपस्थित होते. ही बैठक झाल्यानंतर सर्व अधिकारी बाहेर पडले आणि फक्त मंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चर्चा केली.


या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नव्या मंत्र्यांना सूचना दिल्या. काम करताना चुका होऊ देऊ नका, एकमेकांना सांभाळून घ्या, आमदारांना भेटा, त्यांना मानसन्मान द्या, त्यांची काम करा, लोकांची काम प्राधान्याने करा आणि विशेष म्हणजे मागच्या सरकारमध्ये आमदरांना सन्मान मिळत नव्हता, मंत्री भेटत नव्हते, या सरकारमध्ये तसं होऊ देऊ नका अशा सूचना देण्यात आल्या.


या बैठकीत खाते वाटप, पालकमंत्री आणि कोणाला कोणता बंगला द्यायचा यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. सर्व मंत्र्यांना प्रत्येकी दोन ते तीन खात्यांचे ऑप्शन मागितल्याची माहिती आहे. याशिवाय सरकारी निवासस्थानाबद्दल देखील प्रत्येक मंत्र्यांकडून दोन ते तीन बंगल्यांचे ऑप्शन मागितले आहेत. महत्त्वाची खाती मिळण्यावरून रस्सीखेच सुरु असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला.
 
मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर झाल्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यावर जोरदार टीका झाली. आता तोच कित्ता गिरवत खाते वाटपालाही अपेक्षेपेक्षा विलंब होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार विरोधकांच्या टार्गेटवर आहेत. शिवाय शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.


संभाव्य खाते वाटपाची यादी
दरम्यान मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कोणाला कोणतं खातं मिळणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण सुत्रांच्या माहितीनुसार मंत्रिपदाची यादी फायनल झाली आहे. सर्वात महत्त्वाची दोन खाती म्हणजेच गृह आणि अर्थ खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे तर नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. ही असतील संभाव्य खाती... 


1) एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री (नगरविकास)
2) देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) गृह आणि अर्थ
3) राधाकृष्ण विखे पाटील - महसुल, सहकार
4) सुधीर मुनगंटीवार - ऊर्जा, वन
5) चंद्रकांतदादा पाटील - सार्वजनिक बांधकाम
6) विजय कुमार गावित- आदिवासी विकास
7) गिरीश महाजन - जलसंपदा
8) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा
9) दादा भुसे- कृषी
10) संजय राठोड- ग्राम विकास
11) सुरेश खाडे - सामाजिक न्याय
12) संदीपान भुंभरे- रोजगार हमी
13) उदय सामंत - उद्योग
14) तानाजी सावंत- उच्च तंत्र शिक्षण मंत्री
15) रवींद्र चव्हाण- गृह निर्माण
16) अब्दुल सत्तार- अल्पसंख्यांक विकास
17) दीपक केसरकर- पर्यटन आणि पर्यावरण
18) अतुल सावे - आरोग्य
19) शंभूराज देसाई उत्पादन शुल्क
20) मंगलप्रभात लोढा- विधी न्याय


Maharashtra Cabinet Expansion : खातेवाटप पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता