मुंबई: राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटप लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर कोणत्या मंत्र्याला कोणते खाते हवं याचा पर्याय मागितल्याची माहिती आहे. तसेच कोणता बंगला हवा आहे याचाही ऑप्शन मागितला असल्याची माहिती आहे. मंत्री नाराज होऊ नयेत यासाठी शिंदे आणि फडणवीसांनी हा मार्ग काढल्याची माहिती आहे. 


कुणाला कुठलं खातं द्यायचा आणि कुठला बंगला द्यायचा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुपर्यायी पद्धत ठेवली असल्याची माहिती आहे. मंत्र्यांकडून खात्याचे आणि बंगल्याचे पर्याय आल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्रित बसून विचार करतील आणि अंतिम निर्णय घेतील अशी माहिती आहे. 


राज्यातल्या मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारानंतर आता कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यामुळे कोणताही मंत्री नाराज होऊ नये यासाठी आज सर्व मंत्र्यांना प्रत्येकी दोन ते तीन खात्यांचे ऑप्शन मागितल्याची माहिती आहे. सरकारी निवासस्थानाबद्दल देखील प्रत्येक मंत्र्यांकडून दोन ते तीन बंगल्यांचे ऑप्शन मागितले आहेत. खाते वाटप आणि बंगले वाटप करताना मंत्र्यांची नाराजी होऊ नये यासाठी शिंदे आणि फडणवीस यांचा प्रयत्न आहे. 


दरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आज पहिलीच कॅबिनेट बैठक पार पडली. त्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांना काही सूचना केल्याची माहिती मिळतेय. मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर अधिकाऱ्यांना बाहेर काढून फक्त मंत्र्यांना सोबत बैठक घेण्यात आली. मंत्र्यांना सूचना करताना चुका होऊ देऊ नका, एकमेकांना सांभाळून घ्या, आमदारांना भेटा, त्यांना मानसन्मान द्या, त्यांची काम करा असं सांगितल्याची माहिती आहे. तसेच लोकांची काम प्राधान्याने करा, मागच्या सरकारमध्ये आमदारांना सन्मान मिळत नव्हता, मंत्री भेटत नव्हते. या सरकार मध्ये तसं होऊ देऊ नका अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याची माहिती आहे. काही विषय असेल तर आमच्याकडे या, आपलं हे सरकार सर्वांनी मिळून चालवायचे आहे असंही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 


गुरुवारी सकाळी 9 वाजता शिंदे गटाचे सर्व मंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दर्शनासाठी जाणार असल्याची माहिती आहे.