Maharashtra Assembly Session : बराच काळ रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session) 17 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. 17 ते 25 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन हे 18 जुलै रोजी होईल असे घोषित करण्यात आले होते. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, 17 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीवरील सदस्यांची नामनियुक्त यादी जाहीर करण्यात आली आहे.
केवळ सहा दिवसांचं अधिवेशन
17 ते 25 ऑगस्ट जरी अधिवेशन होणार असलं तरी यामध्ये तीन दिवसांच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळं अधिवेशनाचं प्रत्यक्ष कामकाज हे सहा दिवसांचं असणार आहे. 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक 20,21 ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद आणि विधानसभा बैठकांची तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.
विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठका
पावसाळी अधिवेशन बुधवार 17 ऑगस्टपासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.मुंबईत विधानभवन येथे विधान सभा आणि विधान परिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या.
विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीत ठाकरे गटाला स्थान नाही
विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीत शिवसेनेच्या अंबादास दानवे आणि अनिल परब यांचा समावेश करण्यात आला आहे. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीत ठाकरे गटाला स्थान मिळालेलं नाही. तिथे शिंदे गटाला स्थान देण्यात आलं आहे. पण विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीत मात्र ठाकरे गटाला स्थान देण्यात आलं आहे.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.