Ajit Pawar on Eknath Shinde : "शिवसेनेची स्थापना झाल्यापासून दसरा मेळाव्यात (Dasara Melava) बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी लोक यायचे. पण कालच्या दसरा मेळाव्यात काहींची भाषण नको इतकी लांबली. आता कुणाची लांबली ते तुम्हालाही माहिती आहे," असा मिश्किल टोला राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना लगावला. अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी विविध विकासकामांची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी अजित पवार यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात इतर मुद्द्यांवरही भाष्य केलं.


कोणाच्या पाठीमागे राहायचं हे नागरिकांनी ठरवायचं : अजित पवार
शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन मेळावे झाले. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याविषयी विचारलं असता अजित पवार म्हणाले की, सगळ्यांना कुतूहल होतं. दोघांनी काल भाषणं केली, दोघांचीही भाषणं ऐकली. दोघांनी एकमेकांवर टीका केली. पण मी कोणाच्याही भाषणावर टीका करणार नाही. पण कोणाच्या पाठीमागे राहायचं हे याचा निर्णय आता लोकांना, मतदारांना घ्यायचा आहे."


प्रवाशांना वेठीस धरुन दसरा मेळाव्यासाठी दहा कोटी रुपये एसटीसाठी खर्च : अजित पवार 
"हा कोटी रुपये भरुन बस दसरा मेळाव्याला गेल्याने प्रवाशांची झाले. दोन्हीही गटाचे दसरा मेळावे झाले. यात मुख्यमंत्री यांच्या गटाने दहा कोटी रुपये भरुन बस नेल्या होत्या. त्यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांचे हाल झाले. अशा गोष्टी करता कामा नये. तुम्हाला जसा दसरा मेळावा महत्त्वाचा होता पण जनतेचा देखील विचार करणं गरजेचं होतं. या मेळाव्यात काही काहींची भाषणे तर फारच लांबली ती कुणाची लांबली हे तुम्हाला माहिती आहे," असं अजित पवार म्हणाले.


'कालची वक्तव्ये राजकीय स्वरुपाची होती'
"तुमच्या नावापुढे मुख्यमंत्रीपद लागलं यातच तुमची खुशी होती. पण शिवसेनेचा झेंडा आणि राष्ट्रवादीचा अजेंडा हे तुम्हाला दिसलं नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले. त्यावर विचारलं असता अजित म्हणाले की, "ते मंत्रिमंडळात होते. ते माझ्या उजव्या बाजूला बसायचे. तेव्हा झेंडा शिवसेनेचा आहे पण अजेंडा राष्ट्रवादीचा आहे असं मी ऐकलंच नाही. 1999 पासून आपल्याला विविध पक्षासोबत सरकार चालवायचा अनुभव आहे. सगळे निर्णय एकत्र घेतले. कालची वक्तव्ये ही राजकीय स्वरुपाची होती."


वेदांता प्रकरणात टक्केवारी मागितल्याचं सिद्ध करा : अजित पवार
फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिंदे सरकारकडून महाविकास आघाडी सरकावर टीका केली जात आहे. महाविकास आघाडीने टक्केवारी मागल्याचा आरोप केला जात आहे. यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. "टक्केवारी मागितलं हे सिद्ध करुन दाखवा. वेदांताची मिटिंग ही जुलैमध्ये गेली आणि सरकार जूनमध्ये गेलं. वेदांता त्यांच्या चुकांमुळे गेला. तरुणांचा रोष त्यांच्यावर येईल म्हणून अशाप्रकारचं वक्तव्य केलं," असं अजित पवार म्हणाले. 


अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा
मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघात आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत आम्ही शिवसेनेला जाहीर पाठिंबा दर्शवला असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.


Ajit Pawar Full PC :"काहींची भाषणं नको तितकी लांबली",अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला