मुंबई : रेल्वेने दादरचे 80 वर्षे जुने हनुमानाचे मंदिर (Hanuman Mandir) पाडण्यासाठी नोटीस बजावली होती. यावरून राजकारण चांगलेच तापले होते. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 'एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत', अशी टीका भाजपवर केली होती. तर भाजपने देखील उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आज हनुमान मंदिरात महाआरती करणार होते. मात्र त्याआधीच मंदिराला मिळालेल्या नोटीसीला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आली आहे.
हनुमान मंदिराला आलेल्या नोटीसीची आमदार मंगल प्रभात लोढा यांनी माहिती घेतली. त्यानंतर रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून नोटीसीला स्थगिती देण्यात आली आहे. तर हनुमान मंदिरात नित्यपूजा आणि आरती सुरूच राहणार असे मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे. आता स्थगिती उठवल्यानंतर आदित्य ठाकरे हनुमान मंदिरात आरती करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र भाजपने ठाकरेंच्या हिंदुत्वातली हवा काढली का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
धार्मिक विषयात राजकारण आणू नये : मंगलप्रभात लोढा
याबाबत मंगलप्रभात लोढा म्हणाले की, विश्व हिंदू परिषद आणि आमचे सर्व बजरंग दलाचे पदाधिकारी हे केंद्राशी संपर्कात होते. मी आमच्या पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी आलो आहे. आम्ही जनरल मॅनेजर आणि केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली. काल आमचं मंडळ रेल्वे अधिकाऱ्यांना भेटले होते. काल करण्यात आलेल्या नोटीसीवर आता स्टे ऑर्डर काढण्यात आली आहे. मंदिराच्या विषयांमध्ये राजकारणाविषयी मी काही बोलू इच्छित नाही. या ठिकाणी स्टे मिळाल्यानंतर कशाला कोणी आरती केली पाहिजे? धार्मिक विषयात राजकीय वळण आणू नये, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. मंदिराला काहीही होणार नाही, मंदिर आहे त्याच ठिकाणी राहणार आहे. जे मंदिर जुने आहे, त्याला कोणीही पाडणार नाही. सर्व मंदिर वाचवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या ठिकाणी आहे. निर्णयाची स्टे ऑर्डर माझ्याकडे आलेली आहे, असेही त्यांनी म्हटले.
आदित्य ठाकरे महाआरती करणार?
आज सायंकाळी आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार महेश सावंत यांच्यासह हजारो शिवसैनिक दादरच्या हनुमान मंदिरात आरती करण्यासाठी जाणार आहेत. मात्र, आदित्य ठाकरेंच्या महाआरती आधीच रेल्वेने मंदिराला मिळालेली नोटीस स्थगित केली आहे. आता आदित्य ठाकरे मंदिरात महाआरती करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या