मुंबई : दादरच्या 80 वर्षे जुने हनुमानाचे मंदिर (Hanuman Mandir) पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस बजावली आहे. यावरुन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. 'एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत', अशी टीका टीका त्यांनी केली. तर हिंदू मत मिळवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असल्याचे प्रत्युत्तर भाजपने दिले. आता यावरून शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या डोक्यात सडके कांदे आहेत, सडके बटाटे आहेत. ते काही हिंदुत्वाचे बाप बनलेत का? हिंदुत्वाचा सातबारा त्यांच्या नावावर कोणी केला? भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्यांचं बोट धरून हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेले. त्या वाटेवर पण त्यांनी आता खड्डे करून ठेवले आहे. हे आम्हाला काय हिंदुत्व शिकवत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या
ते पुढे म्हणाले की, मुळात आमचं हिंदुत्व हे मतांसाठी नाही. हिंदुत्व हे आमचे जीवन आहे. हिंदुत्व ही आमची संस्कृती आहे. तुमच्यासारखे आम्हाला हिंदुत्वासाठी कुदळ फावडे घेऊन फिरावे लागत नाही. हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या आणि मग हिंदुत्वावर बोला, असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले. आज दादरच्या हनुमान मंदिरात सायंकाळी महाआरती होणार आहे. आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, मी, स्थानिक आमदार महेश सावंत आणि हजारो शिवसैनिक त्या आरतीला जाणार आहेत. हिंदू म्हणून भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल तर त्यांनी आरतीला यावं. आम्ही त्यांच्या हातात गदा आणि घंटा देऊ, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.
तीन पक्षाचेच लोक एकमेकांविरुद्ध फायली आणणार
उद्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावरून संजय राऊत यांनी महायुतीवर तोफ डागली. ते म्हणाले की, राज्यामध्ये दररोज खून, दरोडे लुटमार सुरू आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांची नागपुरात मिरवणूक निघत आहे. राजा उत्सवात मग्न आहे आणि रस्त्यावर खून पडत आहेत. राज्याला गृहमंत्री नाही, आरोग्यमंत्री नाही, शिक्षणमंत्री नाही, परिवहनमंत्री नाही, रस्त्यावर अपघात होत आहेत, हे कसले राज्य आहे? याला काय राज्य म्हणतात का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तुम्हाला तुमचे मंत्री ठरवता येत नाही. स्वतःचे मंत्री ठरवायला भाजपला दिल्लीत जावे लागत आहे. एकनाथ शिंदेंच्या लोकांमध्ये ताळमेळ नाही. अजित पवार स्वतः गडबडलेले आहेत. मला या राज्याची चिंता वाटते. बहुमत असलेलं सरकार राज्य चालवू शकत नसेल तर या राज्याचे काय होणार आणि हळूहळू एक एक प्रकरण समोरच जाईल. तुम्ही कोणालाही मंत्री करा, तीन पक्षाचेच लोक एकमेकांच्या विरुद्ध फायली आणून देणार आहेत. तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे, असा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे या तीन तंगड्या एकमेकात अडकून महाराष्ट्राचे नुकसान होणार आहे. आमचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आहेत. उद्धव ठाकरे उद्या नागपूरला जात आहेत. तिथे महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. बहुतेक एखाद्या याच अधिवेशन काळात एखादा स्फोट होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
आधीचे आरोग्य मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले
हिंगोलीत 43 महिलांना शस्त्रक्रियानंतर प्रचंड थंडीत जमिनीवर झोपवण्यात आले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, या राज्याला आरोग्य खातेच नाही. आधीचे आरोग्य मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले होते. औषध खरेदी विक्रीमध्ये लाखो कोटीचे कमिशन खात होते. ज्या राज्याला एक महिना आरोग्य विभाग नाही. आधी जे होते ते भ्रष्टाचारीच होते. त्या राज्यात दुसरं काय दुर्दैव घडू शकणार. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.
आणखी वाचा