मालेगाव : 'शालेय शिक्षण मंत्री आता ग्रामीण भागातील शाळेत दिसणार, तसेच शिक्षण विभागही विविध शाळांना भेट देतांना दिसेल' अशी प्रतिक्रिया नुकतीच शालेय शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी मिळालेल्या मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव येथे दिली. गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, असे माझे उद्दिष्ट राहील, नेहमीप्रमाणे रिझल्ट ओरिएंटेड काम आपल्याला दिसेल. अशी प्रतिक्रिया देत शिक्षण क्षेत्राबद्दल त्यांनी भाष्य केलंय. मंत्री भुसे आज कॅबिनेट मंत्री पदाची शाप्पथ घेतल्यानंतर पहिल्यांदा मालेगावात दाखल झाले. त्या दरम्यान ते बोलत होते.
अशातच, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते कमालीचे नाराज झाले आहेत. दरम्यान छगन भुजबळ यांच्या नाराजी बाबत मंत्री दादा भुसे यांना विचारले असता ते म्हणाले की, मला वाटतं हा राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. माझ्या सारख्या कार्यकर्त्याने त्यावर बोलणे उचित राहणार नसल्याचेही ते म्हणाले.
शिंदे साहेब यांचे अतिशय जिव्हाळ्याचे शिक्षण खातं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे अतिशय जिव्हाळ्याचे शिक्षण खातं आहे. याबाबत त्यांनी मला कल्पनाही दिली होती. गरीबातील गरीब पाल्याला चांगलं आणि उत्तम शिक्षण देणे अपेक्षित आहे. मी आणि आम्ही मालेगावकर जीवाचे रान करून गरीबातील गरीब मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या प्रयत्न करू. मंत्री पदाबाबत माझ्यापेक्षाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना काय वाटतं, ते महत्त्वाचे आहे. या विषयात अनेक आव्हाने देखील आहेत. विद्यार्थी, पालक, संस्था यांना विश्वासात घेऊन काम करू. अनेक गावांनी शाळा उच्चाटनासाठी चांगले काम केले आहेत. त्यांना विश्वासात घेऊन काम करू. तसेच पालकमंत्री पदासाठी मुख्यमंत्री आणि दोघेही उपमुख्यमंत्री यावरती लवकरच निर्णय घेतील. तर नाशिक पालकमंत्री पद मला मिळालं यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. असेही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले.
शिक्षण विभागात रिझल्ट ओरिएंटेड काम दिसेल- दादा भुसे
शालेय गणवेश बाबत बोलायचे झाले तर कालच या विभागाची घोषणा झाली. त्यामुळे काळजी करू नका. या विभागात रिझल्ट ओरिएंटेड काम दिसेल. शालेय शिक्षण मंत्री यापुढे तुम्हाला गाव खेड्यांमध्ये शाळांमध्ये व्हिजिट करणारे दिसतील. शिक्षण विभाग देखील शाळेच्या दारी यापुढे नक्कीच दिसेल. एकंदरीत गरिबातील गरीब विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करू, असेही दादा भुसे म्हणाले.
कृषिमंत्री पद देखील नाशिक जिल्ह्यालाही, त्यामुळे..
नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार कांद्याच्या प्रश्नाला घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटलेत. यावेळी 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बाबत आधीच केंद्र सरकारशी बोलले आहेत. लवकरात लवकर शेतकरी हिताचा निर्णय ते घेतील. कृषिमंत्री पद देखील नाशिक जिल्ह्याला मिळालेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकरी हिताचे निर्णय जास्तीत जास्त घेतले जाणार असल्याचे दादा भुसे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या