पुणे : राज्यातील भाजपची संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर अंतर्गत कलह वाढला आहे. यामध्ये पुण्यामध्ये लोकसभेच्या (Pune Loksabha) जागेचा सुद्धा समावेश आहे. पुणे लोकसभेला पुण्याची माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर आता पुणे भाजपमधील वाद उफाळून आला आहे. आज त्याचे प्रत्यक्ष पडसाद पुण्यामध्ये उमटले. पुणे महापालिकेच्या परिसरामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरबाजीमध्ये मोहोळ यांच्यावर तोफ डागण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष जगदीश मुळीक पुणे लोकसभेचा वाद घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचले.


सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस आणि जगदीश मुळीक यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेमध्ये पुणे लोकसभेवरून सुरु झालेल्या वादाची पार्श्वभूमी होती. त्यामुळे पुणे भाजपमध्ये संभाव्य यादीतील नावांवरून वाद रंगल्याची चर्चा आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्ष शिस्त पाळणाऱ्यांना पक्ष प्राधान्य देणार असल्याचे फडणवीस म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर नको, उमेदवारीबाबत पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, असे सांगण्यात आल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. 


मुरलीधर मोहोळांविरोधात बॅनरबाजी 


दरम्यान, आज (7 मार्च)  लोकसभा उमेदवारांच्या यादीत संभाव्य उमेदवार असलेल्या माजी महापौर मुरलीधर मोहोळांविरोधात बॅनरबाजी झाली. त्यामध्ये म्हटलं होतं की, स्टॅंडिंग दिली, महापौर केलं, सरचिटणीस पण केलं, आता खासदारकी पण? आता बास झालं, तुला नक्की पाडणार. कष्टाळू भाजप कार्यकर्ते. अशा मजकुराचा बॅनर हा पुण्यामधील चर्चेचा विषय झाला आहे. हा बॅनर दिसताच पुणे महापालिका प्रशासनाकडून हटवण्यात आला.


दरम्यान, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप नेत्या मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवण्यात आल्यानंतर जगदीश मुळीक यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र, या भाजपच्या संभाव्य यादीत मुरलीधर मोहोळ यांचं नाव आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळांची नियुक्ती करण्यात आली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत ते सक्रियपणे होते. या निवडणुकीदरम्यान अनेक नेत्यांनी मतदारसंघाचे दौरे केले. केंद्रीय मंत्री अमित शाहांनी सुद्धा देखील मतदारसंघाचा दौरा केला होता.


इतर महत्वाच्या बातम्या