Sanjay Raut on Congress : काँग्रेस नेत्यांनी (Congress Leaders) थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये, अजून जागावाटप बाकी आहे. आमच्यामुळं काँग्रेसच्या जागा वाढल्या असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलं. काँग्रेसचे वरीष्ठ नेते असा काही निर्णय घेणार नाहीत.
सर्व लहान मित्र पक्षांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न करावेच लागतील असंही राऊत म्हणाले.
जो जिथं जिंकणार त्यालाच संधी दिली जाईल
महाविकास आघाडीची आज जागावाटपासंदर्भात महत्वाची बैठक पार पडणार आहे. जो जिथं जिंकणारा उमेदवार असेल त्यालाच संधी दिला जाईल असंही संजय राऊत म्हणाले. काही मतभेद झालेच तर पुन्हा बैठक होईल, वरिष्ठ नेते एकत्र बसतील असंही राऊत म्हणाले. दरम्यान, राज्यात तयार होत असलेल्या तिसऱ्या आघाडीसंदर्भात देखील राऊतांना विचारण्यात आलं. यावेळी राऊत म्हणाले की, तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते. कारण ती विरोधकांची मत फोडते असं ते म्हणाले.
मोदी येतात-जातात, कसलं उद्घाटन करतात, त्यांनांच माहिती नसतं
दरम्यान, आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा दौऱ्यावर देखील संजय राऊतांनी टीका केली. मोदी येतात, मोदी जातात. ते कसलं उद्घाटन करतात, त्यांनाच माहिती नसतं असा टोला राऊतांनी लगावला. उद्योगांचं काय? आजही इथले उद्योग गुजरातला जातायत. जम्मू काश्मीरला मोदींनी पूर्ण राज्याच्या दर्जा देण्याची मागणी केलीय. मग आमचा जो भाग गुजरातला नेलाय, तोही परत द्या असे राऊत म्हणाले. बदलापूर प्रकरणाताल आपटे आणि कोतवालला वाचवायचं काम मुख्यमंत्री करतायेत. कारण ते त्यांच्या मुलाच्या मतदारसंघातील लोक आहेत असंही राऊत म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. बैठका, दौरे, जाहीर सभा सुरु झाल्या आहेत. महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नाही. मात्र, काही जागांवर महाविकास आघाडीत ठिकणी पडण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान, सध्या महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यांची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावी अशी शिवसेना ठाकरे गटाची मागणी आहे. अशातच काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदाव दावा करु नये असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे.