Congress Fourth List नवी दिल्ली : काँग्रेसची देशातील लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर झाली आहे.46 जागांसाठी ही यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आसाम, अंदमान निकोबार,छत्तीसगड, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोरम, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश , उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातून एकूण 46 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेसच्या या यादीत महाराष्ट्रातील चार मतदारसंघांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये नागपूरमधून विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा गोंदियातून प्रशांत पडोळे आणि गडचिरोलीमधून नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसनं महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
काँग्रेसनं उत्तर प्रदेशातील 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी लोकसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. वाराणसी मतदारसंघ हा समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्या जागा वाटपात काँग्रेसकडे आला होता. या मतदारसंघात नरेंद्र मोदी विरुद्ध अजय राय अशी लढत होणार हे स्पष्ट झालं आहे.
काँग्रेसनं आज जाहीर केलेल्या 46 उमेदवारांच्या नावाच्या यादीत मध्य प्रदेशातील 12, उत्तराखंडच्या 4 आणि उत्तर प्रदेशातील 9 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. अमेठी आणि रायबरेलीतून काँग्रेसनं उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. मध्य प्रदेशातून दिग्विजय सिंह यांना राजगड लोकसभा मतारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, वाराणसी लोकसभा मतदारसंघात भाजपनं यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तिथं उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे.
आसाममधील 1, अंदमान 1, चंदीगड 1 आणि जम्मू काश्मीरच्या 2 जागांवर काँग्रेसनं उमेदवार जाहीर केले आहेत. मध्य प्रदेशात 12 , महाराष्ट्रात 4, मणिपूरमध्ये 2, मिझोरममध्ये 1, राजस्थान 3, तामिळनाडू 7 आणि पश्चिम बंगालच्या एका जागेवर काँग्रेसनं उमेदवार दिला आहे.
काँग्रेसनं यापूर्वी 138 लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. आज काँग्रेसनं 46 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील 11 जागांवरील उमेदवार काँग्रेसनं जाहीर केले आहेत.
कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, पुण्यातून रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधील गोवाल पाडवी, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, लातूरमधून शिवाजी कालगे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, अमरावतीतून बळवंत वानखेडे, नागपूरमधून विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा गोंदियातून प्रशांत पडोळे आणि गडचिरोलीतून नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
बातमी अपडेट होत आहे...