New Delhi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिल्लीवारी काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीत मॅरोथॉन बैठका सुरु आहेत. शिवाय महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांची ही दिल्लीला जाण्याची किमान तिसरी वेळ आहे. महायुतीचे जागा वाटपाचे अनेक फॉर्म्युले आले. मात्र, अजूनही महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही.
अजित पवार दिल्लीला रवाना
महायुतीचा जागा वाटपांच्या अंतिम चर्चेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. आज उशिरा दिल्लीमध्ये आम्ही शहा यांच्या सोबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवार यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत अमित शाह यांच्याशी जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी आता अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे एकत्रित दिल्लीला गेले आहेत. आजच रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडून जागा वाटपाचा तिढा सुटेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्रात भाजपचे 20 उमेदवार जाहीर
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपने आपल्या उमेदवारांची नाव जाहीर केलेली असली तरी शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अद्याप एकही उमेदवार जाहीर झालेला नाही. दरम्यान गेल्या काही आठवड्यात भारतीय जनता पक्ष महायुतीतील इतर पक्षांना केवळ विनिंग सीटच लढू देणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे अजित पवार आणि शिंदे गटाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळा दिल्लीवारी केली. मात्र, जागा वाटपाचा तिढा काही सुटायचं नाव घेताना दिसत नाही.
महाविकास आघाडीची स्थितीही जैसे थे
महाविकस आघाडीतील पक्षांमध्येही अशाच प्रकारची स्थिती आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये 10 जागांवरुन वाद सुरु आहे. तर शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये 5 जागांवर वाद सुरु आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती. शिवाय त्यांनी उद्धव ठाकरेंसोबतची आघाडी आता राहिली नाही,असे जाहीर केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.