Congress on Sachin Waze, मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी व सध्या गंभीर गुन्ह्याखाली कैदेत असलेल्या सचिन वाझेनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यामागे कोणती शक्ती  आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कोठडीत असलेल्या आरोपीला मीडियाशी बोलण्याची परवानगी नाही मग सचिन वाझेलाच मीडियाला बोलण्याची परवानगी कोणी दिली? याची चौकशी झाली पाहिजे. तसेच सचिन वाझेच्या बंदोबस्तासाठी जे पोलीस होते त्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.


 सरकारमधील नेत्यांवर खोटे आरोप करुन त्यांना गोवण्यासाठी षडयंत्र रचले होते


अतुल लोंढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष यंत्रणांचा कसा गैरवापर करते हे आम्ही वारंवार उघड केले आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांच्या माध्यमातून भाजपाने मविआ सरकारमधील नेत्यांवर खोटे आरोप करुन त्यांना गोवण्यासाठी षडयंत्र रचले होते. आताही माजी गृहमंत्री अनिल देशमुख व श्याम मानव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल केल्याने फडणवीस यांचा भ्रष्ट चेहरा उघडा पडला. आपले बिंग फुटले असून, असत्य लपवण्यासाठी कैदेत असलेल्या सचिन वाझेला पुढे करण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खोट्या गुन्ह्याखाली जेलमध्ये आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही जेलमध्ये टाकले होते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नबाव मलिक हे सुद्धा जेलमध्ये होते पण त्यांना मीडियाशी बोलण्याची परवानगी नाही. मग सचिन वाझेलाच मीडियाशी बोलण्याची परवानगी कशी व ती कोणी दिली? हा सचिन वाझे सरकारचा कोण लागतो, अशी विचारणाही अतुल लोंढे यांनी केली आहे.


देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळले


दरम्यान,सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांनंतर अनिल देशमुख यांच्यावर भाजपा तसेच सत्ताधारी पक्षातील नेते टीका करत आहेत. अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करावा आणि त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. तर खुद्द देशमुख यांनी वाझे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांच्यावर आरोप केले. त्यामुळेच अशा प्रकारचा कट रचला जातोय, असा दावा देशमुख यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


सचिन वाझेंचे पत्र आणि अनिल देशमुखांवरील आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान, कारवाईवर बोलताना म्हणाले...